महिलांनो शिक्षण घ्या, पण पुरुषांसोबत नाही!

महिलांनो शिक्षण घ्या, पण पुरुषांसोबत नाही!

तालिबानचा नवा फतवा

१५ ऑगस्टला तालिबान्यांनी काबूलवर कब्जा करून अफगाणिस्तानमध्ये सत्ता मिळवली. तालिबानने त्यांच्या मागील कारकिर्दीच्या तुलनेत यावेळी बऱ्याच बदलांचे आश्वासन दिले होते. मात्र तालिबानचा खरा चेहरा आता उघड होऊ लागला आहे. तालिबानच्या प्रवक्त्याने महिलांना अनेक प्रकारची सूट देण्याची घोषणा केली होती. पण आता त्यांनी निर्बंध लादायला सुरुवात केली आहे. महिलांना शिक्षण घेण्यास परवानगी दिली असली तरी त्या पुरुषांबरोबर शिक्षण एकाच वर्गात शिक्षण घेऊ शकत नाहीत, असे तालिबानच्या शिक्षण मंत्र्यांनी रविवारी सांगितले.

अफगाणिस्तानमधील लोक शिक्षण घेऊ शकतात. मात्र त्यांना एकत्रितपणे शिकता येणार नाही. इस्लामिक कायद्याप्रमाणे त्यांना स्वतंत्र शिकावे लागेल, असे तालिबानचे शिक्षण मंत्री अब्दुल हक्कानी यांनी रविवारी वरिष्ठांसोबत झालेल्या बैठकीत सांगितले. तालिबान एक इस्लामिक अभ्यासक्रम तयार करण्याचा प्रयत्न करत आहे; ज्यात इस्लाम, राष्ट्रीय आणि ऐतिहासिक मूल्ये शिकवली जातील आणि या अभ्यासक्रमाच्या मदतीने इतर देशांशी स्पर्धा करता येऊ शकते. प्राथमिक आणि माध्यमिक पातळीवरच मुलांना आणि मुलींना वेगवेगळे शिक्षण देण्यात येईल, असे शिक्षण मंत्र्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

अमेरिकेत कोविडचा पुन्हा धुमाकूळ

अमेरिकेच्या रॉकेटने काबुल विमानतळावरील अनर्थ टळला

औरंगजेब म्हणत आहे, इम्रान खान सरकार खोटारडे

‘या’ शिवसेना खासदारावर ईडीचे छापे

महिलांच्या अधिकारांचे रक्षण करण्यात येईल, मात्र इस्लामिक नियमांनुसार केले जाईल, असा दावाही करण्यात आला आहे. महिला शिक्षण घेऊ शकतात, नोकरी करू शकतात, असेही सांगण्यात आले आहे. पण तालिबानी त्यांनी दिलेल्या वचनांवर आणि शब्दांवर किती काळ टिकून राहतील याची शंका उपस्थित होत आहे. रविवारी झालेल्या बैठकीतही कोणत्याही महिलेचा समावेश नव्हता.

विद्यापीठ सुरू करण्यासंबंधीचे निर्णय घेतानाही केवळ पुरुष शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे मत विचारात घेतले गेले, असे एका विद्यापीठातील व्याख्यात्याने सांगितले. महिलांचा समावेश टाळणे; तसेच त्यांच्या कृतीतील आणि बोलण्यातील फरक यातून दिसून येतो, असेही व्याख्यात्याने सांगितले.

विद्यापीठातील प्रवेश संख्येत गेल्या २० वर्षांत वाढ झाली होती. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये शैक्षणिक संस्थांवर झालेल्या हल्ल्यांमुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. शाळांवरील हल्ल्यांची जबाबदारी तालिबानने घेतली नसली तरी लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Exit mobile version