अफगाणिस्तानमध्ये सत्तापालटानंतर नोकरी आणि शिक्षणासारख्या बाबतीत महिलांना सूट देण्याचे आश्वासन देणाऱ्या तालिबानचा खरा चेहरा आता समोर येत आहे. तालिबानने काबूलमधील ‘महिला व्यवहार मंत्रालयात’ महिला कर्मचाऱ्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. तालिबान फक्त पुरुष कर्मचाऱ्यांना मंत्रालयात प्रवेश करू देत आहेत. महिला कर्मचारी अनेक आठवड्यांपासून कामावर येण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांना प्रवेश दिला जात नसून पुन्हा घरी परत जाण्यास सांगितले जात आहे.
गुरुवारी, सरकारी मंत्रालयाचे दरवाजे अखेर महिलांसाठी बंद झाले, असे एका महिलेने सांगितले. तालिबानच्या एका वरिष्ठ नेत्याने या आठवड्याच्या सुरुवातीला सांगितले की, महिलांना सरकारी मंत्रालयात पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची परवानगी नाही. विभागात काम करणाऱ्या आणखी एका महिलेने सांगितले की, मी माझ्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती आहे असे असताना एका अफगाणी स्त्रीने काय करावे, असा सवाल तिने उपस्थित केला आहे.
हे ही वाचा:
…आणि भाईगिरीतून मित्रानेच केली मित्राची हत्या!
… आणि वेळच आली माणासापेक्षा माकडं बरी म्हणण्याची!
या समस्यांबाबत अफगाण महिलांनी काबूलमधील राष्ट्रपती भवनाबाहेर निदर्शनेही केली आहेत. त्यांनी तालिबानकडे त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याची आणि मुलींना अभ्यास आणि नोकरी करण्याची परवानगी देण्याची मागणी केली. यावेळी तालिबानने सरकारची घोषणा करण्यापूर्वी दावा केला होता की, या वेळी ते अधिक संयमाने आणि चांगल्या प्रकारे राज्य करतील. त्यांच्या सरकारमधील महिलांना नोकरी आणि अभ्यास करण्याची परवानगी असेल.
मात्र, सरकारची घोषणा होताच तालिबानला त्यांनीच केलेल्या सर्व आश्वासनांचा विसर पडला आहे. तालिबान्यांनी महिलांना कामावर रुजू होण्यास बंदी घातली आहे आणि त्यांनी विद्यापीठात महिलांनी काय घालता येईल यासाठी नियम लागू केले आहेत. वर्गात, विद्यापीठ स्तरावर पुरुष आणि स्त्रिया एकाच वर्गात अभ्यास करू शकतात, परंतु त्यांच्यामध्ये पडदे लावले गेले आहेत. त्याचबरोबर शालेय स्तरावर सहशिक्षण पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.