भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत लॉन बॉल या क्रीडा प्रकारात सोनेरी कामगिरी केली. भारताचे या क्रीडाप्रकारातील हे पहिलेच सुवर्ण आहे. पण या खेळात सहभागी झालेल्या चार महिलांचा पूर्वेतिहास पाहिला तर मात्र आश्चर्य वाटल्यावाचून राहात नाही.
सर्वसाधारणपणे एखाद्या खेळात चमकलेले खेळाडू हे लहानपणापासूनच तो खेळ खेळत असतात. मात्र लॉन बॉलमध्ये भारताला सुवर्ण जिंकून देणाऱ्या लव्हली चौबे, नयनमोनी सैकिया, रुपा रानी तिर्की आणि पिंकी या खेळाडू यापूर्वी वेगळ्याच खेळात खेळलेल्या होत्या मात्र नंतर त्यांनी लॉन बॉल खेळाला आत्मसात केले आणि थेट सुवर्ण जिंकले.
भारताने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेवर मात करत हे सुवर्णपदक पटकाविले.
या चार महिलाना वयाचाही कोणता अडथळा जाणवला नाही. लव्हली चौबे ४२ तर रुपा रानी ३४, सैकिया ३३ तर पिंकी ४२ वर्षाची आहे.
हे ही वाचा:
आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघेंवर बलात्कार प्रकरणात गुन्हा?
‘लालसिंह चढ्ढा’वर प्रेक्षकांची का सटकली?
राष्ट्रकुल स्पर्धेत आणखी दोन सुवर्णपदकांवर भारताची मोहोर
जीएसटी संकलनात महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा
लव्हली ही झारखंडची. झारखंड पोलिसमध्ये कॉन्स्टेबल असलेली लव्हली ही लांबउडीपटू होती. पण दुखापतीमुळे तिला खेळ सोडावा लागला. नंतर ती लॉन बॉल खेळू लागली. एका राष्ट्रीय स्पर्धेत तिने ७० हजाराचे इनाम जिंकले आणि तिचे विश्वच बदलले.
रुपा रानी ही लव्हलीसोबतच खेळत असे. रांचीची कबड्डीपटू असलेली रुपा लॉन बॉलकडे वळली. ती झारखंडमध्ये जिल्हा क्रीडाधिकारीही आहे.
नयनमोनी सैकिया ही आसामची खेळाडू आणि वनअधिकारी. मुळात ती वेटलिफ्टर. पायाच्या दुखापतीमुळे तिने खेळ सोडला. नंतर लॉन बॉलला तिने आपलेसे केले आणि आज ती सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे.
पिंकी तर राज्यस्तरावरची क्रिकेटपटू. आता शारीरिक शिक्षक म्हणून काम करते. तिच्या शाळेत लॉन बॉल खेळाचे आयोजन केले गेले तेव्हा तिला या खेळाबद्दल रुची निर्माण झाली.