अफगाणिस्तानमधील सत्तेची सूत्रे तालिबान्यांच्या हाती गेल्यापासून तिकडची परिस्थिती बिघडत असल्याचे चित्र समोर येत आहे. अफगाणिस्तानमधील तालिबानच्या ताब्यात असलेल्या भागांमध्ये गंभीर छळवणुकीच्या घटना घडत आहेत. शरणागती पत्करलेले सैनिक, सामान्य नागरिकांना फासावर लटकावून सामूहिक हत्याकांडे केली जात आहेत. महिलांवर निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे, असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार प्रमुख मिशेल बॅचेलेट यांनी मंगळवारी दिला.
अफगाणिस्तानचा ताबा तालिबान्यांनी घेतल्यामुळे देशात पुन्हा एकदा क्रूरतेचे दर्शन होण्याची भीती आहे. त्यांच्या पूर्वीच्या सत्ताकाळाचा अनुभव घेता खबरदारी घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. सत्तापालट झाल्यावर तालिबान्यांनी स्वतःची प्रतिमा बदलली असल्याचे चित्र उभे केले आहे. मात्र तरीही तिकडील नागरिक देश सोडण्यासाठी आटापिटा करत आहेत. तालिबान्यांच्या बोलण्यात आणि कृतीत फरक असल्याने तिकडचे लोकही दडपणात आहेत. माजी सैनिक आणि सामान्य नागरिकांना फासावर लटकवून सामूहिक हत्या होत असल्याची माहिती मिळत असून तिथे मुलांची सैन्यात भरती, मुलींच्या शिक्षणावरील निर्बंध आणि महिलांच्या अधिकारांवर गदा आणणे अशा मुद्द्यांवर मिशेल यांनी लक्ष वेधले.
हे ही वाचा:
सीआयए-तालिबान दरम्यान गुप्त भेट
‘उद्धव ठाकरे ममतांसारखे विचारी, संयमी’
मुख्यमंत्री इतक्या कोत्या मनाचा, सूडबुद्धी असू शकत नाही
अफगाणिस्तानमधील नागरिकांची सुटका करण्याचे काम सुरू असून मंगळवारी ७८ नागरिकांना भारतात आणण्यात आले. या नागरिकांमध्ये भारतीय नागरिक आणि अफगाणिस्तानातील शीख व हिंदू नागरिकांचा समावेश आहे. आतापर्यंत ८०० नागरिकांना भारतात आणण्यात आले आहे. ब्रिटनने आतापर्यंत ८,६०० नागरिकांची सुटका केली असून त्यात स्थानिक आणि अफगाणी नागरिकांचा समावेश आहे. राजकीय आणि सुरक्षा दलाच्या माध्यमातून अमेरिका दररोज तालिबानशी संपर्कात आहे, तसेच इतर देशांशीही संपर्कात आहे. बचावकार्याचा आढावा आढावा घेत असल्याचे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुल्लिव्हन यांनी सांगितले आहे.