एखाद्या देशाचे पंतप्रधान हे त्यांच्या पहिल्याच परदेश दौऱ्यावर गेलेत पण कोणताही करार करायला नाही तर कर्ज मागायला. कर्जात बुडालेल्या आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरायला पंतप्रधान विदेश दौरे करतायत. ज्या देशांकडून कर्ज घेऊन अर्थव्यवस्था कोलमडली आहे त्या देशांकडूनच पुन्हा कर्ज मागतायत. तर कोणता आहे हा देश? कोणत्या देशाची गोष्ट आहे ही.
ही गोष्ट आहे भारताचा शेजारी देश असलेल्या पाकिस्तानची. गेल्या काही महिन्यांमध्ये या देशात चांगलंच राजकीय नाट्य रंगलं होतं. माजी पंतप्रधान इम्रान खान यांचं सरकार अविश्वास ठराव पास झाल्यामुळे पडलं आणि पंतप्रधान पदी आले शाहबाझ शरीफ. आता शरीफ हे पंतप्रधान झाल्यामुळे पाकिस्तानची डबघाईला आलेली अर्थव्यवस्था सुधारायला ते पावलं उचलतील का? आणि त्यासाठी काय काय करतील? याकडे सर्वांचं लक्ष होतं. त्यातचं ते सौदी अरेबियाला त्यांच्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी गेले. या दौऱ्यामध्ये पाकिस्तान सौदी अरबकडून ३.२ अब्ज डॉलरचे अतिरिक्त पॅकेज मागणार आहेत. पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या साठ्यात आणखी घट होऊ नये म्हणून हे पॅकेज मागितले जाणार आहे. एकूणच कर्जात पार बुडालेला पाकिस्तान आता पुन्हा कर्जाचा आधार घेत असल्याचं चित्र आहे.
इम्रान खान सरकार सत्तेत येण्यापूर्वी चीनने पाकिस्तानला अनेक कर्जे दिली आहेत. माजी पंतप्रधान इम्रान खान हे जेव्हा सत्तेत आले होते तेव्हा परदेशातून कर्ज घेणार नाही, असं इम्रान खान यांनी सांगितलं होतं. पण आपल्या साडेतीन वर्षांच्या कारकिर्दीत १८ लाख कोटी रुपयांचं सार्वजनिक कर्ज जोडून त्यांनी देशाला कंगाल केलं. पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारने १ सप्टेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत दररोज १४.२ अब्ज रुपयांचं सार्वजनिक कर्ज लादून नवाझ शरीफ यांच्या कालावधीपेक्षा दुप्पट कर्ज देशावर बोज म्हणून जोडलं. याच कालावधीत एकूण सार्वजनिक कर्जात साधारण ७३ टक्क्यांनी वाढ झाली. आकडेवारीनुसार फेब्रुवारी २०२२ पर्यंत, पाकिस्तान सरकारचं एकूण कर्ज ४२.८ ट्रिलियन पाकिस्तानी रुपये इतकं आहे.
पाकिस्तानमधलं चित्र असं आहे की दुसऱ्या देशांकडून कर्ज घ्यायचं आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं चक्र हाकायचं. सौदी अरेबिया, चीन, जागतिक बँक, आशियाई विकास बँक आणि इतर अनेक मित्र राष्ट्र आहेत ज्यांच्याकडून कर्ज घेऊन घेऊन पाकिस्तान कर्जबाजारी झाला आहे. अगदी रशिया आणि युक्रेन यांच्या युद्ध काळातही इम्रान खान हे रशियाकडे मदतीसाठी गेले होते. त्यावेळी युद्धात रशियाच्या विरोधात असलेल्या अमेरिकेने पाकिस्तानला रशियाकडे मदत मागितली म्हणून चांगलाच दणका दिला होता.
दुसरीकडे आता पाकिस्तानचे नवे पंतप्रधान ज्या सौदी अरेबियाकडे मदत मागायला गेलेत तो सौदी पाकिस्तानचा मित्र देश आहे. मध्यंतरीच्या काळात या दोन्ही देशांचे संबंधांवर थोडे परिणाम झाले होते. त्याचवेळी सौदीचे सेनाप्रमुख भारत दौऱ्यावर आले होते आणि तिकडे पाकिस्तानमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. सौदी अरेबियाने भारतासोबत मैत्रीचा हात पुढे करणं म्हणजे इम्रान खान सरकारच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश असल्याचं पाकिस्तानमधल्या विरोधी पक्षाने म्हटलं होतं. त्याचवेळी पाकिस्तानमध्ये आर्थिक संकट आणि महागाईचा सामना करावा लागला आणि इम्रान खान सरकार पायउतार झालं. त्यामुळे आता पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला सावरायला सौदी धावून येणार का याकडे लक्ष असणार आहे.
हे ही वाचा:
धक्कादायक! मुंबई विद्यापीठाच्या लॉ अभ्यासक्रमाचा पेपर केला ‘सोप्पा’
वीजसंकटावर गृहमंत्री अमित शहा उचलणार पाऊल
बर्लिनमध्ये लहान मुलीच्या चित्राचे केले पंतप्रधान मोदींनी कौतुक
‘शिवसेना नेत्यांना बुद्धिदोष झाला आहे’ आशीष शेलारांची टीका
शाहबाझ शरीफ सौदीमध्ये पोहचले पण जेव्हा ते मदिना येथील मस्जिद-ए-नवाबीमध्ये प्रवेश करत होते तेव्हा तिथल्या लोकांनी चोर चोर अशा घोषणा दिल्या. यालाही इम्रान खान जबाबदार असल्याचं म्हटलं गेलं. दुसरीकडे असाच श्रीलंका देश नुकताच कर्ज घेऊन घेऊन कर्जाच्या बोज्याखाली येऊन दिवाळखोर झालाय. श्रीलंकेनेसुद्धा सर्वात जास्त कर्ज हे चीनकडून घेतलं आहे. चीन हा इतर देशांमधल्या विकास कामांमध्ये गुंतवणूक करून त्या देशांना कर्जबाजारी करतोय. हे चित्र आता काहीसं स्पष्ट होऊ लागलं आहे. श्रीलंकेसोबतच नेपाळचीही परिस्थिती सारखी आहे. त्यामुळे या देशांच्या परिस्थितीवरून पाकिस्तान धडा न घेता त्याचे कर्ज वाढवतच चालला आहे. त्यामुळे पाकिस्तानची परिस्थितीसुद्धा अशीच होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. इम्रान खान यांनीसुद्धा देशासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन देशाला कर्जबाजारी बनवले त्यामुळे आता शाहबाझ शरीफ यांची भूमिका काय असणार आहे याकडे लक्ष असणार आहे.