पाकिस्तानला वेश्यालय म्हणणाऱ्या अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्लाह मोहिब यांनी लंडनमध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरिफ यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा चांगलाच जळफळाट झालाय. विशेष म्हणजे हमदुल्लाह मोहिब मागील काही काळापासून पाकिस्तानवर सडकून टीका करत आहेत. त्यांनी पाकिस्तानवर तालिबानला मदत केल्याचाही आरोप केलाय. त्यानंतर इम्रान खान यांच्या मंत्र्यांनी त्यांना थेट लक्ष्य केलंय. आता नवाज शरिफ यांच्या भेटीनंतर मोहिब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश शरिफ यांना दिल्याचा आरोप इम्रान खान यांचे राजकीय सल्लागार शाहबाज गिल यांनी केला आहे.
हमदुल्लाह मोहिब सातत्याने पाकिस्तान सरकारला लक्ष्य करत आहेत. त्यामुळे इम्रान खान यांचे मंत्री मोहिब यांना सर्वात मोठा शत्रू मानत आहेत. आता त्यांनी इम्रान यांच्या विरोधकांची भेट घेतल्यानं पाकिस्तानमध्ये चर्चेला उधाण आलंय. मोहिब शरिफ यांच्यासोबत मिळून काही राजकीय योजना करत असल्याचंही बोललं जातंय. पाकिस्तान सरकारने अफगाणिस्तावर टीका करण्यास सुरुवात केल्यानंतर मोहिब आणि राज्य मंत्री सैय्यद सादत नदेरी यांनी लंडनमध्ये शरिफ यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय.
इम्रान खान यांचे राजकीय सल्लागार शाहबाज गिल यांनी मोहिब आणि शरिफ यांच्या भेटीवरच प्रश्न उपस्थित केलेत. तसेच या भेटीमागे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात असल्याचा दावा केलाय. त्यांनी ट्विट करत म्हटलं, “नवाज शरीफ यांनी पाकिस्तान विरोधात बोलणाऱ्या अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्याची भेट घेतलीय. मोहिब यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश देण्यासाठी नवाज शरीफ यांची भेट घेतली. पाकिस्ताना व्याप्त काश्मीरमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यात वाद तयार करण्यासाठीच ही भेट झालीय.”
हे ही वाचा:
‘हे’ नवे विधेयक मोदी सरकार आणणार
पंतप्रधान आवास योजनेतून पूरग्रस्तांना घरे बांधून देणार
ऑलिम्पिकमध्ये तिरंगा घेऊन संपूर्ण देश रोमांचित झाला
तालिबानविरुद्ध आता रशिया आणि ताजिकिस्तानही सज्ज
अफगाणिस्तान, भारत आणि नवाज शरिफ पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरमध्ये अडचणी तयार करण्याचा प्रयत्न करत आहे, असाही आरोप करण्यात येतोय. अफगाणिस्तानने याआधी १५ हजार नवे तालिबानी कट्टरतावाद्यानी अफगाणिस्तानमध्ये घुसखोरी केल्याचा आणि यातील १० हजार पाकिस्तानमधून आल्याचा आरोप केलाय. अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपतींनी देखील पाकिस्तान हवाई दलावर तालिबानला मदत करण्याचा आरोप केलाय.