देशात सर्वत्र कोविड बाधितांचे आकडे हळूहळू उतरणीला लागले आहेत. डॉक्टरांच्या, आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या अनेक महिन्यांच्या प्रयत्नांनंतर देशातील कोरोना कहर आटोक्यात येऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने भारताचे कौतुक केले आहे.
हे ही वाचा: कोविडवरील विजय दृष्टीपथात, कोविड लसीकरण… दिग्गजांनी केला मोदींना सॅल्यूट!, कोविडचा वेग मंदावला
रोडेरिको ओफ्रिन या जागतिक आरोग्य संघटनेच्या भारतातील प्रतिनिधींनी एएनआयला दिलेल्या वक्तव्यानुसार, “गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत कोविड-१९च्या बाधितांची संख्या हळूहळू कमी होत आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येचा विचार करता भारत सरकारला याबाबत अभिमान वाटला पाहिजे.” यावेळी त्यांनी भारताच्या लसीकरण मोहिमेचे देखील कौतुक केले. १६ जानेवारीपासून भारताच्या लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली आणि २२ दिवसांत भारताने सहा मिलीयन लोकांना लस दिली आहे. ही जगातील सर्वात वेगवान लसीकरण मोहिम असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्याचबरोबर ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम आहे.
गेल्या २४ तासात भारतात कोविड-१९च्या १२ हजार ९२३ नव्या रुग्णांची नोंद झाली. सध्या देशभरात १ लाख ४२ हजार ५६२ बाधित रुग्ण आहेत. भारतात एकूण रुग्णसंख्या १ कोटी ८ लाख ७१ हजार २९४ इतकी असून बऱ्या झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १ कोटी ५ लाख ७३ हजार ३७२ इतकी आहे. गेल्या चोविस तासात देशभरात १०८ लोकांचे कोविड-१९ मुळे मृत्यु झाले. त्यामुळे देशभरात कोविड- १९ मुळे झालेल्या एकूण मृत्युंची संख्या १ लाख ५५ हजार ३६० वर पोहोचली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लसींच्या पुरवठ्याबाबत आभार मानले आहेत. भारताने नेपाळ, भूतान, मालदिव, म्यानमार, बांगलादेश या शेजारी राष्ट्रांना लसींचा पुरवठा केला आहे.