अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प हे निवडून आले असून ते जानेवारी महिन्यात पदभार स्वीकारणार आहेत. दरम्यान, ट्रम्प हे आपल्या नव्या टीमच्या बांधणीच्या कामाला लागले आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या टीममध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. एलॉन मस्क ते विवेक रामास्वामी अशा नावांना संधी मिळाली असून अमेरिकेत घडणाऱ्या या सर्व घडामोडींकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.
विवेक रामास्वामी आणि एलॉन मस्क हे डिपार्टमेंट ऑफ गव्हरमेंट एफिशियंसी (DOGE) प्रमुख असणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, या दोन उत्कृष्ट व्यक्ती एकत्रितपणे माझ्या सरकारमधील नोकरशाही साफ करण्यापासून अनावश्यक खर्च कमी करणे, अनावश्यक नियम काढून टाकणे आणि फेडरल एजन्सीची पुनर्रचना करणे या सर्व गोष्टींवर काम करतील. ट्रम्प सरकारमध्ये इतक्या मोठ्या आणि महत्त्वाच्या पदाची जबाबदारी भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामी यांना मिळाल्यानंतर जगभरात या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
कोण आहेत विवेक रामास्वामी?
भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी हे रिपब्लिकन पक्षाचे अमेरिकन नेते आहेत. त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून दावा केला होता. मात्र, या शर्यतीतून त्यांनी माघार घेतली. रामास्वामी यांचा जन्म १९८५ साली ओहिया येथे झाला. त्यांचे आई- वडील भारतातून स्थलांतरित झाले होते. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून जीवशास्त्राची पदवी मिळवली आणि त्यानंतर येल लॉ स्कूलमध्ये त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. रामास्वामी हेज फंड गुंतवणूकदार म्हणून काम करत होते. त्यांनी येलमधून पदवी प्राप्त करण्यापूर्वी अनेक दशलक्ष डॉलर्स कमावले होते.
रामास्वामी यांचे वडील व्ही. जी. रामास्वामी हे मूळचे केरळ येथील पलक्कड येथील आहेत. केरळमधील स्थानिक महाविद्यालयातून अभियांत्रिकी पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांच्या वडिलांनी ओहायोच्या इव्हनडेल येथील जनरल इलेक्ट्रिक प्लांट येथे काम सुरू केले. तर विवेक यांची आई सिनसिनाटीमध्ये मानसोपचारतज्ज्ञ होत्या. तर रामास्वामी यांच्या पत्नी अपूर्व तिवारी या ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी वेक्सनर मेडिकल सेंटरमध्ये डॉक्टर आहेत.
हे ही वाचा :
पूर्व लडाखमधील भारत- चीन सीमेवर गस्त घालण्याची एक फेरी पूर्ण
जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते!
दिल्लीच्या हवेत सुधारणा नाहीच; उत्तर प्रदेशसह पंजाब, आसाममध्येही दाट धुके
२०१४ मध्ये विवेक रामास्वामी यांनी स्वतःची बायोटेक कंपनी, रॉईवंट सायन्सेसची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी पूर्णपणे विकसित न झालेल्या औषधांसाठी मोठ्या कंपन्यांकडून पेटंट विकत घेतले. त्यांनी २०२१ मध्ये या कंपनीच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला. २०२२ मध्ये, रामास्वामी यांनी स्ट्राइव्ह ॲसेट मॅनेजमेंट कंपनीची स्थापना केली. फेब्रुवारी २०२३ मध्ये, रामास्वामी यांनी २०२४ च्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाच्या नामांकनासाठी आपली उमेदवारी जाहीर केली. नंतर, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे देखील अध्यक्ष पदाच्या शर्यतीत आल्याने रामास्वामी यांनी त्यांच्या साठी निवडणुकीतून माघार घेत ट्रम्प यांना पाठिंबा जाहीर केला.
अमेरिकेत बेकायदेशीर राहणाऱ्या नागरिकांविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. ते म्हणाले होते की, जर मी सत्तेत आलो तर अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या परदेशी नागरिकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येईल. अवैधरित्या राहत असलेल्या प्रवाशांवर कारवाई केली जाईल. तसेच, त्यांच्या मुलांना मिळालेले अमेरिकेचे नागरिकत्वही रद्द केलं जाईल.