जागतिक आरोग्य संघटनेने भारतात सापडलेल्या बी.१.६१७.२ या कोरोना विषाणूला नवे नाव दिले आहे. त्यामुळे आता हा विषाणू डेल्टा या नावाने ओळखला जाईल. तर डिसेंबर २०२० मध्ये ब्रिटनमध्ये सापडलेल्या बी.१.१.७ या घातक विषाणूला अल्फा म्हणून संबोधण्यात येईल. तर दक्षिण आफ्रिकेतील बी.१.३५१ हा विषाणू बीटा आणि नोव्हेंबर २०२० मध्ये दक्षिण आफ्रिकेतच सापडलेल्या पी. १ व्हेरिएंटसाठी आता गामा हे नाव निश्चित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने देशातील सोशल मीडिया कंपन्यांना आपापल्या व्यासपीठावरून इंडियन व्हेरिएंट हा उल्लेख काढून टाकण्याचे आदेश दिले होते.
व्हिएतनाममध्ये कोरोना विषाणूचा आणखी एक घातक उपप्रकार (व्हेरिएंट) सापडल्याचे समोर आले आहे. व्हिएतनामच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हेरिएंट भारत आणि इंग्लंडमध्ये आढणाऱ्या विषाणूपासून तयार झाला आहे. या कोरोना व्हेरिएंटच्या हवेतून प्रसाराचा वेग एरवीपेक्षा जास्त आहे.
व्हिएतनामधील तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हा विषाणू भारत आणि इंग्लंडमधील कोरोना विषाणूच्या संगमातून तयार झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून अद्याप यावर कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. व्हिएतनाममध्ये आतापर्यंत कोरोनाचे एकूण सात व्हेरिएंट आढळून आले आहेत. यामध्ये भारत व इंग्लंडमधील बी.१.६१७.२ आणि बी.१.१.७ व्हेरिएंटसचाही समावेश आहे.
काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना कोरोनाच्या बी.१.६१७ या व्हेरिएंटचा उल्लेख इंडियन व्हेरिएंट असा करू नये, अशा सक्त सूचना दिल्या होत्या. तसेच अशाप्रकारचा उल्लेख असलेला मजकूर संबंधित व्यासपीठावरून तात्काळ हटवण्याचे निर्देश केंद्राने दिले होते.
हे ही वाचा:
कोरोना बाधितांच्या संख्येत २५ हजारांची घट, कोरोनाबळींची संख्याही कमी
नदीत मृतदेह टाकणाऱ्या दोघांना अटक
अजय देवगणने ६० कोटीला घेतले नवे घर
११ मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या बी.१.६१७ व्हेरिएंटविषयी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर काही वृत्तसंस्थांनी याचा उल्लेख इंडियन व्हेरिएंट, असा करायला सुरुवात केली होती. मात्र, हा दावा सपशेल पोकळ आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या निवेदनात बी.१.६१७ व्हेरिएंटचा कुठेही भारताशी संबंध जोडलेला नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, चुकीच्या माहितीमुळे भारताच्या प्रतिमेला तडा जात आहे. त्यामुळे माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना इंडियन व्हेरियन्टबाबतचा मजकूर काढून टाकण्याचे निर्देश दिले होते.