गाझा पट्टीतील रुग्णालयावरील हल्ला कोणी केला?

इस्रायल-हमासचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

गाझा पट्टीतील रुग्णालयावरील हल्ला कोणी केला?

हमास आणि इस्रायलदरम्यानचा संघर्ष आणखी चिघळला आहे. या युद्धादरम्यान इस्रायलने दक्षिण गाझा भागात खान युनिस आणि राफामध्ये भीषण बॉम्बवर्षाव केला. इस्रायलने येथील एका रुग्णालयावर हल्ला केल्याचा दावा गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने केला आहे. या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र इस्रायलने हे आरोप फेटाळून लावले आहेत. हमासनेच डागलेल्या क्षेपणास्त्रामुळे ही दुर्घटना झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे.

पॅलिस्टिनी इस्लामिक जिहाद दहशतवादी संघटनेने डागलेल्या अयशस्वी रॉकेट प्रक्षेपणामुळे रुग्णालयावर हल्ला झाल्याचा आरोप इस्रायलच्या लष्कराने केला आहे. आयडीएफ म्हणजे इस्रायल संरक्षण दलाचा यात सहभाग नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

रुग्णालयावर झालेल्या या हल्ल्यावर जगभरातून टीका होत आहे. अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांच्यासह संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेने यावर टीका केली आहे. बायडेन यांनी याबाबत इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांच्याशी चर्चा केल्याचेही बायडेन यांनी सांगितले. ‘संपूर्ण जगाला हे कळायला हवे की गाझामध्ये क्रूर दहशतवाद्यांनी एका रुग्णालयावर हल्ला केला आहे. हा हल्ला आयडीएफने केलेला नाही. ज्यांनी आमच्या लहान मुलांची हत्या केली आहे, ते त्यांच्या मुलांचाही गळा घोटत आहेत,’ असे नेतान्याहू यांनी सांगितले. या हल्ल्याला आयडीएफने पॅलिस्टिन इस्लामिक जिहाद नावाच्या एका पॅलिस्टिनी दहशतवादी संघटनेला जबाबदार ठरवले आहे. या संघटनेला अमेरिकेनेही एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे.

हे ही वाचा:

ठरले; भारत २०३५ पर्यंत अंतराळ स्थानक उभारणार, २०४० पर्यंत चंद्रावर मानव पाठवणार

श्वानांच्या मदतीने इस्रायलमधील पीडितांना देणार दिलासा

आता इस्रायलचे प्रमुख लक्ष्य हमासचा ‘क्रूरतेचा चेहरा’

अंमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी ईडीची मुंबईत छापेमारी

वृत्तानुसार, इस्रायलने खान युनिसच्या पश्चिम आणि दक्षिण-पूर्व आणि राफाच्या पश्चिमेकडील भागांना लक्ष्य केले. इस्रायलने सर्वसामान्य लोकांना उत्तर गाझामधून दक्षिण गाझामध्ये जाण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे गाझामधून पलायन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक राफामध्ये जमले होते. राफा आणि खान युनिसबाहेर हल्ला झाल्यानंतर जखमींना रुग्णालयात नेण्यात आले, असे गाझाच्या निर्वासितांनी सांगितले. हमासचे वरिष्ठ अधिकारी आणि माजी आरोग्य मंत्री बासम नईम यांनी राफा आणि खान युनिसमध्ये ८० जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. खान युनिसच्या नासिर रुग्णालयात सुमारे ५० मृतदेह आणले आहेत.

Exit mobile version