गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेले रशिया आणि युक्रेन या दोन देशांमधील युद्ध दिवसेंदिवस अधिकच तीव्र होताना दिसत आहे. अशातच या युद्धाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या विश्वयुद्धाची सुरुवात होणार का? असे प्रश्न उपस्थित होताना दिसले. याबाबतच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी भाष्य केले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी शुक्रवार, ११ मार्च रोजी रशियाला गंभीर इशारा दिला आहे. रशियाने युक्रेनच्या विरोधात जर रासायनिक शस्त्रांचा वापर केला तर त्याची मोठी किंमत रशियाला चुकवावी लागेल असे बायडन यांनी म्हटले आहे. तर नाटो आणि रशियातील संघर्षातून तिसरे महायुद्ध सुरु होऊ शकते असा गंभीर इशारा बायडन यांनी दिला आहे.
बायडन यांनी पुढे असे सांगितले की अमेरिका युक्रेनमध्ये तिसरे महायुद्ध लढत नाहीये. पण एक योग्य असा संदेश आपण देत आहोत की नाटो सदस्यांच्या एक एक इंच जमिनीचे संरक्षण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहेत. बायडन यांनी अमेरिकेचे जवळपास बारा हजार सैनिक रशियाच्या सीमांवर पाठवल्याचे सांगितले आहे. यावेळी बायडन यांनी युक्रेनच्या नागरिकांचे कौतुक केले आहे. रशियन सैन्याच्या विरोधात युक्रेनच्या नागरिकांनी खूप हिंम्मत आणि धैर्य दाखवल्याचे बायडन यांनी म्हटले आहे. तर आपण भविष्यातही युक्रेनला पाठिंबा देणार असून आपल्या मित्रांसोबत अमेरिका कायम उभी असल्याचे बायडन यांनी म्हटले आहे.
नाटो हा अमेरिका आणि युरोप खंडातील ३० देशांचा समूह आहे. युक्रेनला या समूहाचे सदस्य व्हायचे आहे. रशिया आणि युक्रेन मधील युद्धामागे हे एक महत्वाचे कारण आहे.