युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये चर्चेदरम्यान झालेल्या बाचाबाचीनंतर जगभरात चर्चेला नवा विषय मिळाला आहे. यापूर्वी कधीही दोन देशांच्या सर्वोच्च नेत्यांमध्ये माध्यमांसमोर अशा प्रकारे वादावादी झालेली ऐकिवात नाही. या वादानंतर झेलेन्स्की चर्चा सोडून निघून गेले तर ट्रम्प यांनीही शांततेच्या मुद्द्यावर बोलायचे असल्यास चर्चेला येऊ शकता असं म्हटलं. दरम्यान, या वादावर रशियासह अनेक देशांकडून प्रतिक्रिया आली आहे.
या बैठकीदरम्यान, अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावर तीन वर्षांच्या युद्धात अमेरिकेच्या मदतीबद्दल कृतज्ञ नसल्याचा आरोप केला. युक्रेनकडे सध्या कोणतेही पर्याय नाहीत. एकतर तुम्ही तडजोड करा किंवा आम्ही बाहेर पडू आणि जर आम्ही बाहेर पडलो तर तुम्ही लढणार आणि मला वाटत नाही की ते चांगले होईल, असा इशारा त्यांनी दिला. या बाचाबाचीनंतर, अमेरिका आणि युक्रेनमधील दुपारच्या जेवणाच्या आणि दुर्मिळ खनिजांच्या व्यवहारांवरील महत्त्वाची बैठक रद्द करण्यात आली.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी एक्स अकाउंटवरून युक्रेनशी सहमती दर्शवत लिहिले की, “रशियाने बेकायदेशीरपणे आणि अन्यायकारक पद्धतीने युक्रेनवर आक्रमण केले. गेल्या तीन वर्षांपासून युक्रेनचे लोक धैर्याने आणि दृढनिश्चयाने लढत आहेत. लोकशाही, स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वासाठीचा त्यांचा लढा हा आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. न्याय आणि शाश्वत शांतता साध्य करण्यासाठी कॅनडा युक्रेन आणि युक्रेनियन जनतेसोबत उभा राहील.
रशियाचे माजी अध्यक्ष आणि रशियन सुरक्षा परिषदेचे उपप्रमुख दिमित्री मेदवेदेव यांनी टेलिग्रामवर लिहिले की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला जोरदार धक्का दिला आहे. पहिल्यांदाच, ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्या तोंडावर त्यांना सत्य सांगितले की, युक्रेन तिसऱ्या महायुद्धाशी खेळत आहे. याची गरज होतीच पण त्यांना लष्करी पाठिंबा थांबवला पाहिजे.
तसेच, रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा म्हणाल्या की ट्रम्प आणि उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी झेलेन्स्की यांच्यावर हल्ला करण्यापासून स्वतःला रोखले हा एक चमत्कार आहे. “मला वाटते की झेलेन्स्कीचा सर्वात मोठा खोटारडेपणा म्हणजे व्हाईट हाऊसला केलेला दावा की, २०२२ मध्ये कीव राजवट कोणत्याही पाठिंब्याशिवाय एकटी पडेल.”
दरम्यान, हंगेरीचे रशिया समर्थक पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन म्हणाले की ट्रम्प शांततेसाठी धैर्याने उभे आहेत. जरी अनेकांना ते पचवायला कठीण जात असले तरी. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या गोंधळाच्या बैठकीनंतर ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे झेलेन्स्की यांच्याशीही चर्चा केली. स्टारमरच्या कार्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, पंतप्रधानांनी आज रात्री राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की दोघांशीही बोलले आहे. युक्रेनला त्यांचा पाठिंबा अढळ आहे आणि युक्रेनच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षिततेवर आधारित कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी ते शक्य तितके प्रयत्न करत आहेत.
हे ही वाचा :
उत्तराखंडमध्ये झालेल्या हिमस्खलनामध्ये चार कामगारांचा मृत्यू
८ मार्चपासून मणिपूरमधील सर्व रस्त्यांवर सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्याचे निर्देश
हिजबुल मुजाहिदीनच्या पाच दहशतवाद्यांच्या मालमत्ता जप्त
संतोष देशमुख प्रकरण: वाल्मिक कराडंच मुख्य सूत्रधार, खंडणीसाठी केली हत्या
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज म्हणाले की, त्यांचा देश आवश्यक तोपर्यंत युक्रेनच्या पाठीशी उभा राहील. युक्रेनचे लोक केवळ त्यांच्या राष्ट्रीय सार्वभौमत्वासाठी लढत नाहीत तर ते आंतरराष्ट्रीय कायद्याच्या राज्यासाठी देखील लढत आहेत, असे त्यांनी सिडनीमध्ये पत्रकारांना सांगितले.
तुमची प्रतिष्ठा युक्रेनियन लोकांच्या शौर्याचा सन्मान करते, असे युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. बलवान व्हा, धाडसी व्हा, निर्भय व्हा. तुम्ही कधीही एकटे नसता. आम्ही तुमच्यासोबत न्याय आणि शाश्वत शांततेसाठी काम करत राहू, असंही त्यांनी म्हटले आहे.