23 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनियाचीनने जे आज पेरलंय तेच उद्या तिथे उगवेल!

चीनने जे आज पेरलंय तेच उद्या तिथे उगवेल!

भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी करण्यासाठी चीन प्रयत्नशील

Google News Follow

Related

भारत आणि चीन या दोन्ही देशांचे संबंध फारसे काही बरे नाहीत हे सर्वश्रुत आहे. या दोन्ही देशांमधील संबंध सुधारावेत यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू असले तरी ते एकतर्फी असून चीनला मात्र त्यात काही रस नसल्याचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. भारतावर कुरघोडी करण्यासोबतच भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर कशी कोंडी होईल यासाठी चीन सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहे. नुकताच भारत आणि अमेरिका या दोन देशांनी एका दहशतवाद्याला काळ्या यादीत टाकण्यासंबंधीचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) मांडला होता. मात्र, चीनने खोडा घालत हा प्रस्ताव नाकारला.

मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यात सहभागी असलेला पाकिस्तानमधील लष्कर- ए- तोयबाचा दहशतवादी साजिद मीर याला ‘जागतिक दहशतवादी’ म्हणून घोषित करावे, असा हा दोन देशांचा प्रस्ताव होता. मुंबईवर झालेल्या इतक्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यात साजिदचा सहभाग होता. अनेक निष्पाप लोकांचा प्राण त्याने घेतला. त्यामुळे त्याला ‘जागतिक दहशतवादी’ म्हणून घोषित करावं यासाठी भारत प्रयत्नशील आहे. मात्र, चीनच्या आडमुठी भूमिकेमुळे हा प्रस्ताव रखडला.

एकीकडे आंतरराष्ट्रीय मंचावर दहशतवादाविरोधात भूमिका घ्यायची. दहशतवाद विरोधातील लढाईत सहभागी आहोत असं दाखवून द्यायचे पण जेव्हा दहशतवादाविरोधात खरंच काही करण्याची वेळ येते तेव्हा मात्र कच खायची, सोयीस्करपणे दोन पावलं मागे यायचे. गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या मुद्द्यावर चीनच्या भूमिकेची पुनरावृत्ती याच पद्धतीने होताना दिसत आहे. सध्या दहशतवादी साजिद मीर याचा मुद्दा चर्चेत असला तरी दहशतवाद विरोधातील आडमुठी भूमिका चीनने यापूर्वीही अनेकदा घेतली आहे. भारताला कोणतेही ध्येय साध्य करू द्यायचं नाही याचं उद्देशाने चीन आपल्या भूमिका घेत असतो हे आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे.

शेकडो निष्पाप बळी घेणारा दहशतवादी साजिद मीर हा भारतासाठी पकडला जाणं अत्यंत महत्त्वाचा आहे हे चीन चांगलंच जाणून आहे. भारताच्या दहशतवाद विरोधातील लढाईला अनेक महत्त्वाच्या देशांची भारताला साथ आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या १२६७ अल कायदा निर्बंधांनुसार साजिद मीर याला काळ्या यादीत टाकून जागतिक दहशतवादी घोषित करावे, असा प्रस्ताव अमेरिकेने भारताच्या अनुमोदनासह मांडला. हा प्रस्ताव जर मंजूर झाला असता तर, साजिद याची मालमत्ता गोठवून त्याच्यावर प्रवासबंदी लादून त्याच्या शस्त्रास्त्र व्यापाराला आळा घालता आला असता. एकूणच साजिदची कोंडी झाली असती. पण, चीनने त्यात खोडा घातला. चीनने आधी हा प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याचे सप्टेंबरमध्येचं स्पष्ट झाले होते. पण आता चीनने या प्रस्तावाला थेट नकार दिला आहे. एकदा दहशतवाद्याविरुद्ध ठराव मंजूर झाला नाही तर तो ठराव पुन्हा सहा महिने आणता येत नाही. त्यामुळे साजिद मीरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करून घेण्यासाठी दोन्ही देशांना सहा महिने वाट पहावी लागणार आहे.

साजिद मीर कोण आहे?

साजिद मीर हा भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक आहे. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील त्याच्या भूमिकेसाठी अमेरिकेने त्याच्यावर ५ दशलक्षचे डॉलर्सचे इनाम ठेवले आहे. साजिद मीर हा पाकिस्तानस्थित लष्कर- ए- तोयबा या दहशतवादी संघटनेचा वरिष्ठ सदस्य असून नोव्हेंबर २००८ च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता. लष्कर- ए- तोयबाच्या ऑपरेशन्सचा तो मॅनेजर होता. हल्ल्याची तयारी, नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये त्याची प्रमुख भूमिका होती.

पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी यापूर्वी साजिद याचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. परंतु, पाश्चात्य देशांनी त्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्याच्या मृत्यूचा पुरावा मागितला. त्यानंतर तो जिवंत असल्याचे समोर आले होते.

यापूर्वीही चीनने खोडसाळपणा केला होता

दहशतवादी संघटना जैश- ए- मोहम्मदचा दहशतवादी अब्दूल रौफ अजहर याला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव भारत आणि अमेरिकेने संयुक्तपणे मांडला होता. तेव्हाही संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत एकट्या चीनने याला विरोध केला. चीनच्या आडकाठीमुळेच अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांनी मांडलेला हा प्रस्ताव दुसऱ्यांदा मंजूर झाला नाही. अब्दुल रौफचा भारतात झालेल्या अनेक दहशतवादी कृत्यांमध्ये सहभाग होता. १९९९ मध्ये भारतीय विमानाचं अपहरण, २००१ मध्ये संसदेवरील हल्ला, पठाणकोट येथे भारतीय हवाई दलाच्या तळावरील हल्ला या सगळ्या काळ्या कृत्यांमध्ये रौफचा सहभाग होता. त्यामुळे त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावं असा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

त्यानंतरही याचं दोन देशांनी म्हणजेच भारत आणि अमेरिकेने संयुक्तपणे लष्कर- ए- तोयबाचा उपप्रमुख अब्दुल रहमान मक्की याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात यावं यासाठी संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव ठेवला होता. दोन्ही देशांनी त्याला देशांतर्गत कायद्यांनुसार दहशतवादी म्हणून घोषितही केले होते. या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रांमध्ये इतर देशांनी पाठिंबा दिला पण, मक्कीला जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्याच्या प्रस्तावावर चीनने अखेरच्या क्षणी आडकाठी आणली होती.

अब्दुल रहमान मक्की हा लष्कर- ए- तोयबाचा प्रमुख हाफिज मुहम्मद सईद याचा मेहुणा आहे. शिवाय लष्कर- ए- तोयबाच्या अनेक कारस्थानांमध्ये याने म्होरक्या म्हणून काम केले आहे. लष्कर- ए- तोयाबासाठी फंड मिळवण्याचे म्हणजेच आर्थिक रसद पुरवण्याचे काम करण्यामध्ये मक्कीची प्रमुख भूमिका होती. दहशतवादी संघटनेमध्ये तरुणांची भरती करणे, त्यांना कट्टरपंथी बनवणे, हल्ल्याची योजना आखणे अशी कामे मक्की करत होता. जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचार घडवण्यामध्ये मक्कीचा हात होता. २००० साली लाल किल्ल्यावर झालेला दहशतवादी हल्ला, रामपूर सीआरपीएफ कॅम्पवर २००८ मध्ये झालेला हल्ला, मुंबईत २६ नोव्हेंबर रोजी झालेला दहशतवादी हल्ला, श्रीनगरमधल्या करन नगरमध्ये २०१८ सालचा हल्ला, मे २०१८ ला बारामुल्ला येथील खानपोरामधील हल्ला, जून २०१८ मध्ये श्रीनगरमधील हल्ला आणि ऑगस्ट २०१८ मध्ये बांदीपोरा येथील हल्ल्यांची जबाबदारी लष्कर- ए- तोयबाने घेतल्यामुळे अब्दुल रहमान मक्कीचा नक्कीच या हल्ल्यांमध्ये सहभाग होता असे म्हणता येईल. इतक्या कुकर्मांमध्ये सहभाग असूनही मक्की चीनच्या वरदहस्तामुळे झाकला गेला होता. मात्र, अखेर २०२३ मध्ये मक्कीला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं. पाकिस्तानस्थित दहशतवादी हाफिज तलह सईद, लष्कर-ए-तैयबाचा नेता शाहिद महमूद यांच्या विरोधातील प्रस्तावही चीनने रोखून धरले होते.

जैश- ए- मोहम्मदचा दहशतवादी मसूद अजहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठीच्या प्रस्तावाला चीनने तब्बल चार वेळा रोखून ठेवलं होतं. पण अखेर २०१९ मध्ये भारताला यश आलं आणि पाकिस्तान आधारित जैश- ए- मोहम्मद प्रमुख मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आले.

चीनची आडकाठी भूमिका कशासाठी आणि कोणासाठी?

चीनची अर्थव्यवस्था ही एक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आशिया खंडाचा विचार केला तर चीनला कट्टर स्पर्धा ही भारताची आहे. त्यामुळे सतत भारताला विरोध करायचा, कुरघोडी करायची हेच चीनचं लक्ष्य आहे. पाकिस्तानशी हातमिळवणी करून भारताला जास्तीत जास्त कसं कोंडीत पकडता येईल यासाठी चीन संधी शोधत असतो. पाकिस्तान आणि चीन यांचे चांगले संबंध आहेत हे जगजाहीर आहे. चीनकडून अनेकदा पाकिस्तानला आर्थिक मदत देखील करण्यात आली आहे. दुसरीकडे भारत- पाकिस्तान किंवा भारत- चीन या देशांचे संबंध ताणलेले आहेत हेही जगजाहीर आहे. पण केवळ भारताला खाली खेचण्यासाठी म्हणून उघडमार्गे किंवा मग छुप्या मार्गाने दहशतवादाला खतपाणी घालून भारताच्या आणि जगाच्या चिंता वाढवणं ही चीनची भूमिका कितपत योग्य आहे? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होतो.

महासत्ता बनायचं या स्वप्नाने झपाटून गेलेला चीन सध्या चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देत आहे. दहशतवादाचा धोका आज भारताला, युरोपियन देशांना आणि अगदी अमेरिकेलाही आहे तसाच उद्या तो चीनलाही असणार आहे किंवा असेलही. जे पेरणार तेच उगवणार या म्हणीनुसार चीनची अवस्था होऊ शकते. चीनमधील वाईट घटनांची फार वाच्यता जगभरात होत नाही त्यामुळे चीनमधील सत्य परिस्थितीबद्दल जग अंधारातचं असतं. पण, भविष्याचा विचार करून चीनने दहशतवाद विरोधी लढ्यात इतर देशांची साथ देणं गरजेचं आहे.

चीन अधिकारांचा गैरवापर करत आहे का?

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये अमेरिका, ब्रिटन, चीन, फ्रान्स आणि रशिया हे पाच राष्ट्रे स्थायी सदस्य आहेत. त्यांना ‘व्हेटो’चा अधिकार आहे, म्हणजे त्यांच्यापैकी कोणीही परिषदेच्या कोणत्याही ठरावाच्या विरोधात मतदान केले तर तो ठराव मंजूर होणार नाही. याच अधिकाराचा चीन गैरवापर करत असल्याचे दिसून येत आहे.

हे ही वाचा:

लाखो वारकऱ्यांना मिळणार विमा संरक्षण

इलॉन मस्क म्हणतात, ‘मी मोदींचा चाहता’

केवळ पैशासाठी मित्राच्या आईला मारणाऱ्यांना जन्मठेप

नंदन निलेकणींकडून आयआयटी मुंबईला ३१५ कोटींची देणगी

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत काळानुसार बदल व्हावेत अशी मागणी अनेक देशांची आहे. तसे बदलाचे वारे वाहण्याची शक्यताही आहे. या बदलांमध्ये आगामी काळात भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे हे नक्की. भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढते महत्त्व हे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष साबा कोरोसी यांनी केलेल्या वक्तव्यावरून दिसून येते. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताची गरज असल्याचं स्पष्ट मत नुकतेच अध्यक्ष साबा कोरोसी यांनी व्यक्त केलं आहे.

भारताची विकासाच्या दिशेने सुरू असलेली घोडदौड सारं जग पाहत आहे. अनेक महत्त्वाचे देश आज भारतासोबत ठामपणे उभे आहेत. भारताच्या भूमिकेचं, गाठलेल्या यशाचं कौतुक होतं आहे. या विकासमार्गावर चालताना चीन, पाकिस्तानसारखे शत्रूदेश भारताच्या प्रवसात आडकाठी करण्याचा प्रयत्न करत असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील हा नवा भारत यातून आपलं ध्येय कसं साध्य करणार याकडे साऱ्या जगाचं लक्ष असणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा