अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अफगाणिस्तान प्रश्नावर आपली भूमिका जाहीर केली आहे. अमेरिकेने आपल्या आजवरच्या सर्वात मोठा युद्धाला विराम देण्याचा निर्णय घेतला आहे असे ते म्हणाले. माझ्या या निर्णयावर प्रचंड टीका होईल पण ती मी सहन करेन असे बायडन यांनी सांगितले.
बायडन यांनी सत्तारूढ झाल्यानंतर अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयामुळेच अफगाणिस्तान मधील परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे म्हटले जात आहे. तर त्यांच्या या निर्णयावर जगभरातून टीका देखील होताना दिसत आहे. यावर देखील बायडन यांनी भाष्य केले असून ‘ही टीका सहन करायची माझी तयारी आहे’ असे ते म्हणाले.
I know my decision on Afghanistan will be criticized. But I would rather take all that criticism than pass this responsibility on to yet another president.
It’s the right one for our people, for the brave servicemembers who risk their lives serving our nation, and for America.
— President Biden (@POTUS) August 16, 2021
काय म्हणाले बायडन?
वीस वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा अफगाणिस्थान मध्ये दाखल झालो तेव्हा आमचे ध्येय स्पष्ट होते. ११ सप्टेंबर २००१ रोजी आमच्यावर ज्यांनी हल्ला केला ते आम्हाला हवे होते आणि अल कायदाने आमच्यावर हल्ला करण्यासाठी अफगाणिस्तानचा वापर करू नये असे आम्हाला वाटत होते. आम्ही हे दशकभरापूर्वीच साध्य केले आहे. अफगाणिस्तानची राष्ट्रनिर्मिती हे आमचे मिशन कधीच नव्हते.
आत्ता जी परिस्थिती आपण पाहत आहोत ती बघता हे खेदाने नमूद करावेसे वाटते की कितीही मोठ्या प्रमाणात अमेरिकी सैन्य पाठवले तरीही स्थिर, एकसंध आणि सुरक्षित अफगाणिस्तानची निर्मिती करणे शक्य नाही. आज जे घडत आहे तेच पाच वर्षांपूर्वी किंवा पंधरा वर्षांनंतर घडले असते.
मला या गोष्टीची कल्पना आहे की अफगाणिस्तान संदर्भातील माझ्या निर्णयावर प्रचंड टीका होईल. पण भविष्यात येणाऱ्या दुसऱ्या कोणत्या राष्ट्राध्यक्षावर ती जबाबदारी टाकण्यापेक्षा मी ती टीका सहन करेन. अमेरिकेच्या लोकांसाठी आणि या राष्ट्रासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या आमच्या शूर सैनिकांसाठी हा निर्णय योग्य आहे.
जे युद्ध लढण्याची इच्छा अफगाणिस्तानच्या सैन्याची नाही. ते युद्ध अमेरिकन सैन्याने लढून हौतात्म पत्करू नये.
American troops cannot — and should not — be fighting and dying in a war that Afghan forces are by and large not willing to fight and die in themselves.
— President Biden (@POTUS) August 16, 2021
आज दहशतवादाचा धोका हा अफगाणिस्तानच्या पलीकडे गेला आहे. त्यासाठी आम्ही आवश्यक त्या दहशतवाद विरोधी कारवाया करत असतो. जिथे अमेरिकेचा कायमस्वरूपी सैन्य तळ नाही अशा अनेक देशात आम्ही दहशतवादी गटांच्या विरोधात कारवाई करतो. आवश्यकता भासल्यास अफगाणिस्थानमध्येही आम्ही तेच करू.
Today the terrorist threat has metastasized beyond Afghanistan. We conduct effective counterterrorism missions against terrorist groups in multiple countries where we don’t have a permanent military presence.
If necessary, we will do the same in Afghanistan.
— President Biden (@POTUS) August 17, 2021
सद्यस्थितीत अमेरिकन सैन्याच्या ६००० तुकड्या अफगाणिस्तानात पाठवण्यात येणार आहेत. अफगाणिस्तानात अडकलेल्या अमेरिका आणि मित्र देशांच्या नागरिकांच्या सुटकेसाठी या सैन्य तुकड्या पाठवण्यात येत आहेत. आत्ताचे हे सैनिकी मिशन छोटेखानी स्वरूपाचे असणार आहे. ज्याचे मुख्य उद्दिष्ट अमेरिकन नागरिक आणि मित्र राष्ट्राच्या नागरिकांची सुखरूप मुक्तता हे असेल. आम्ही हे मिशन पूर्ण करू आणि आमचे सैन्य अफगाणिस्तानातून मागे घेऊ. आम्ही अमेरिकेच्या आजवरच्या सर्वात मोठ्या युद्धाला विराम देऊ.
Our current military mission will be short in time and focused in its objectives:
Get our people and our allies to safety as quickly as possible.
And once we have completed this mission, we will conclude our military withdrawal. We will end America’s longest war.
— President Biden (@POTUS) August 17, 2021
जयशंकर आणि ब्लिंकन यांच्यात चर्चा
दरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी अमेरिकेच्या सेक्रेटरी ऑफ द स्टेट अँटोनी ब्लिंकन यांच्यासोबत चर्चा केली. या चर्चेत काबूल मधील विमानतळ पुन्हा कार्यान्वित करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे. या संदर्भात अमेरिकेकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची जयशंकर यांनी प्रशंसा केली आहे.