आयपीएलनंतर विराट सोडणार बेंगळुरूचे कर्णधारपद

आयपीएलनंतर विराट सोडणार बेंगळुरूचे कर्णधारपद

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली यंदाच्या आयपीएल हंगामानंतर या संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. आरसीबीनेच ही घोषणा केली आहे.

बेंगळुरूच्या अधिकृत ट्विटरवरून विराटच्या या निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे. त्यात विराटने म्हटले आहे की, हेलो, संपूर्ण आरसीबी कुटुंब, बेंगळुरूचे निस्सीम चाहते आणि जे आम्हाला पाठिंबा देतात त्यांच्यासाठी एक घोषणा मी करू इच्छितो. मी संध्याकाळी आमच्या संघव्यवस्थापनाशी बोललो. माझ्या गेला काही काळ जे मनात आहे, ते मी त्यांना सांगितले. आरसीबीचा कर्णधार म्हणून हा माझा अखेरचा आयपीएल हंगाम असेल. पण मी बेंगळुरूचा खेळाडू म्हणून खेळत राहणार आहे. सर्व आरसीबी चाहत्यांचे खूप आभार. माझ्यावर त्यांनी विश्वास दाखविला आणि माझ्या पाठीशी ते उभे राहिले.

कोहलीने पुढे या ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझ्यावर जी जबाबदारी टाकण्यात आली आहे, ती पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे. गेले नऊ वर्षे बेंगळुरू संघासोबत सुरू असलेला माझा प्रवास अत्यंत आनंददायी होता.

आयपीएलच्या अगदी प्रारंभापासून बेंगळुरू संघाकडून कोहली खेळत आलेला आहे. २००८मध्ये आयपीएल सुरू झाली तेव्हाच कोहलीला बेंगळुरूमध्ये स्थान मिळाले. त्यानंतर २०११मध्ये तो कर्णधारपदी विराजमान झाला. २०१६मध्ये आरबीसीची सर्वोत्तम कामगिरी पाहायला मिळाली. त्यावेळी आरसीबीने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. पण आरसीबीला आजपावेतो एकदाही आयपीएलचे विजेतेपद पटकाविता आलेले नाही. त्यावर्षी कोहलीने सर्वाधिक ९७३ धावा केल्या होत्या. आयपीएलच्या एका हंगामात एवढ्या धावा कुणीही केलेल्या नाहीत.

हे ही वाचा:

हाताचा तळवा दाखवा, पैसे भरा…काय आहे हे तंत्र जाणून घ्या!

जॅवलिन एक प्रेमकथा…नीरज चोप्राच्या जाहिरातीचा धमाका

चरणजीत सिंग चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री

बीकेसी पूल दुर्घटनेसंबंधी कंत्राटदारावर अखेर गुन्हा

नुकतीच कोहलीने भारताच्या टी-२० संघाच्या कर्णधारपदालाही विराम दिला आहे. त्यामुळे बेंगळुरूचे कर्णधारपदही तो सोडणार का, याची चर्चा सुरू झाली होती. अखेर त्याने ते कर्णधारपदही सोडले आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये सात सामन्यांत बेंगळुरूने पाच विजय मिळविले आहेत. सोमवारी बेंगळुरूची लढत कोलकाता नाइट रायडर्सशी होईल.

Exit mobile version