पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तीन ब्राँझपदके जिंकल्यानंतर आपल्या पदरात आणखी पदके पडणार का अशा चिंतेत असलेल्या भारताला कुस्तीगीर विनेश फोगाटने सुवर्ण किंवा रौप्य यापैकी एक पदक निश्चित केले आहे. २९ वर्षीय विनेशने भारताला चौथे पदक मिळवून दिले आहे. अर्थात आता अंतिम फेरीत तिला कोणते पदक जिंकता येते हे लवकरच कळेल. पण हे ऑलिम्पिकमधील महिला कुस्तीगीराचे दुसरे पदक असेल. मात्र पहिले सुवर्ण किंवा रौप्य असेल. त्यामुळे ही भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी असेल. साक्षी मलिकने २०१६ मध्ये भारताला ब्राँझ जिंकून दिले होते.
क्युबाच्या युस्नेलीस गुझमान हिला तिने ५-० असे पराभूत केले. दोन्ही खेळाडूंनी अत्यंत सावध खेळ केला. प्रतिस्पर्ध्याचे डावपेच यशस्वी होणार नाहीत याची काळजी दोघींनीही घेतली. अर्ध्या मिनिटात दोघीना खाते उघडता आले नाही. गुझमानने भक्कम बचाव केला. पण पहिली फेरी संपायला एक मिनिट शिल्लक असताना विनेशने १-० अशी छोटी आघाडी घेतली होती. त्याच दरम्यान गुझमानने विनेशचा उजवा पाय धरत तिच्यावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र विनेशने उत्कृष्ट बचाव करत ते प्रयत्न हाणून पाडले.
हे ही वाचा:
बांगलादेशनंतर ब्रिटनमध्ये हिंसाचार; प्रवाशांसाठी सूचना जारी
परकीय हाताच्या शोधात, एक हसिना, एक दिवाना…
अगदी कमी वेळेत हसिना यांनी केली भारतातील आश्रयाबद्दल विनंती
दुसऱ्या फेरीत मात्र विनेश अधिक आक्रमक झाली आणि तिने ५ गुणांची आघाडी घेतली. त्यामुळे तिचा अंतिम फेरीतील मार्ग मोकळा झाला. याआधी सुशील कुमार, योगेश्वर दत्त यांनी भारताला ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदके जिंकून दिली आहेत. विनेशने सुवर्ण जिंकले तर तो नवा इतिहास असेल. भारताचे पहिले वैयक्तिक पदक देखील कुस्तीत मिळाले आहे. महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांनी भारताला हे यश मिळवून दिले होते.