चांद्रयान ३चे लँडर ‘विक्रम’ आणि रोव्हर ‘प्रज्ञान’ पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आता मावळली आहे. ही माहिती शुक्रवारी सुप्रसिद्ध अंतराळ वैज्ञानिकांनी दिली. म्हणजेच भारताची चांद्रयान मोहीम आता संपुष्टात झाल्यात जमा आहे. ‘आता लँडर आणि रोव्हर पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता नाही. असे होणार असते, तर ते याआधीच झाले असते,’ अशी माहिती चांद्रयान मोहिमेशी सक्रियपणे जोडलेले अंतराळ आयोगाचे सदस्य आणि इस्रोचे माजी अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांनी दिली.
‘नवीन चांद्रदिवस सुरू झाल्यानंतर सौरऊर्जेवर चालणारे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल. म्हणजेच ही दोन्ही उपकरणे कार्यान्वित आहेत की नाहीत, हे समजेल,’ असे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने २२ सप्टेंबरला सांगितले होते. तूर्त तरी दोन्ही उपकरणांकडून कोणत्याही प्रकारचे संकेत मिळत नसल्याची माहिती त्यांनी दिली होती.
हे ही वाचा:
हमास दहशतवाद्यांच्या हल्ल्याला इस्रायलकडून एअर स्ट्राईकने उत्तर
ऑनलाईन गेमिंग ऍप प्रकरणी बॉलिवूड प्रोडक्शन हाऊसवर छापा
एनएसएस स्वयंसेवकांनी लावलेली झाडे का उपटून टाकण्यात आली?
विकासाच्या योजनांमुळे राज्यातील नक्षलग्रस्त भागाचा चेहरामोहरा बदलतोय!
इस्रोने चंद्रावर रात्र होण्याआधीच २ आणि ४ सप्टेंबर रोजी लँडर आणि रोव्हरला निष्क्रीय केले होते. मात्र चंद्रावर सूर्योदय झाल्यानंतर ही दोन्ही उपकरणे पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता होती. लँडर आणि रोव्हर यांचे कार्य एक चांद्र दिवस म्हणजेच पृथ्वीवरचे १४ दिवस चालेल, अशा पद्धतीनेच या उपकरणांचे डिझाईन करण्यात आले होते.
इस्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता चांद्रयान ३ मोहिमेने सर्व उद्दिष्ट्ये पूर्ण केली गेली आहेत. ज्यामध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग, चंद्रभोवती रोव्हरचे भ्रमण आणि चंद्राच्या पृष्ठभागावरील वैज्ञानिक प्रयोगांचा समावेश आहे. ‘चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताने टाकलेले पाऊल ही भारताची सर्वांत मोठी कामगिरी आहे. येथे आतापर्यंत एकही देश पोहोचू शकला नव्हता. त्यामुळे तेथील माहितीपासून आतापर्यंत मानव अज्ञात होता. आता आपल्याला चंद्राच्या या पृष्ठभागावरची माहितीही मिळणार आहे. हे खूप मोठे लक्ष्य आपण गाठले आहे,’ असे किरण कुमार यांनी सांगितले.