एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीचे सीएफओ (वित्त विभागाचे प्रमुख) म्हणून भारतीय वंशाचे वैभव तनेजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आधीचे सीएफओ झॅचरी किरखॉर्न पायउतार झाल्यामुळे त्यांच्या जागी तनेजा यांची नियुक्ती झाली आहे.
कंपनीतर्फे सोमवारी हे जाहीर करण्यात आले. किरखॉर्न हे १३ वर्षे टेस्लासोबत होते, तर चार वर्षांपासून ते सीएफओ म्हणून कंपनीचा वित्त विभाग सांभाळत होते. त्यांच्या जाण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. ते कामकाज सुरळीत होण्यासाठी वर्षअखेरीसपर्यंत कंपनीसोबत राहतील. ४५ वर्षीय तनेजा हे सन २०१६मध्ये टेस्ला कंपनीत रुजू झाले होते. तेव्हाही त्यांच्यावर चीफ अकाऊंटिंग ऑफिसर म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.
किरखॉर्न यांच्या कार्यकाळात, टेस्ला कंपनीचे बाजार मूल्य एक ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचले होते आणि त्यांनी पहिल्या तिमाहीत नफाही जाहीर केला होता. सन २०१९मध्ये तिमाही निकालांवर चर्चा करण्यासाठी मस्क हे विश्लेषकांसह कॉन्फरन्स रूममध्ये बसले असताना सन २०१९मध्ये सीएफओ दीपक आहुजा यांच्या जागी किरखॉर्न यांची नियुक्ती झाल्याचे मस्क यांनी जाहीर करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.
हे ही वाचा:
मोहोब्बत की दुकान, चायना का सामान; भारतविरोधी कारवायांसाठी चीनचे न्यूजक्लिकला फंडिंग
हरमनप्रीत सिंगचा १५०वा गोल, भारताने मलेशियाला केले पराभूत
सरकार जिंकले; दिल्ली सेवा विधेयक १३१ वि. १०२ मतांनी संमत
राजस्थान बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी मारली चितेत उडी
आणि आता स्वत: किरखॉर्न हे कंपनीतून बाहेर पडत आहेत. ‘या कंपनीचा एक भाग बनणे हा एक विशेष अनुभव आहे. मी १३ वर्षांपूर्वी या कंपनीत सहभागी झालो. तेव्हापासून आम्ही एकत्र केलेल्या कामाचा मला खूप अभिमान आहे,’ असे किरखॉर्न यांनी एका लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांच्याशी एका वृत्तसंस्थेने लिंक्डइनवर संपर्क साधला असता, त्यांनी उत्तर दिले नाही. त्यावेळी टेस्लाचे शेअर्स सुमारे २ टक्क्यांनी खाली होते.
‘ते वर्षाच्या शेवटपर्यंत कंपनीत राहणार आहेत, याचा अर्थ ते वैयक्तिक कराणासाठीच कंपनीतून बाहेर पडत आहेत. आणि हे वैयक्तिक कारण म्हणजे एलॉन मस्क. त्याच्यासोबत काम करणे खरोखर कठीण आहे आणि त्यांनी ते १३ वर्षे केले आहे,’ अशी प्रतिक्रिया डीपवॉटर अॅसेट मॅनेजमेंटमधील व्यवस्थापकीय भागिदार जीन मुन्स्टर यांनी दिली. किरखॉर्न यांच्याकडे या वर्षाच्या प्रारंभी मस्क यांचे संभाव्य उत्तराधिकारी म्हणूनही पाहिले जात होते.