महाराष्ट्रातील कोविडचा कहर वाढायला लागल्यामुळे मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरातील परप्रांतीय मजूरांनी गावची वाट धरली आहे. त्यामुळे रोजच्या रोज उत्तर आणि पूर्व भारतात जाणाऱ्या रेल्वे गाड्या मजूरांनी भरून जात आहेत. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने अशा प्रकारे मुंबई आणि महाराष्ट्र तसेच गुजरात, पंजाब आणि इतर राज्यांतून परतणाऱ्या मजूरांसाठी कोविड निर्बंध जारी केले आहेत. त्यासंदर्भातील सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
उत्तर प्रदेश राज्य सरकारने ७५ जिल्हाधिकाऱ्यांना येणाऱ्या मजूरांना राहण्यासाठी कोविड सेंटरची उभारणी करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्यावर्षी मे २०२० मध्ये ज्याप्रमाणे स्वयंपाक घरांची निर्मीती करून त्यांच्या अन्नाची देखील सोय करण्याचे आदेश दिले आहेत. ही व्यवस्था मजूर आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अर्थसंकल्पापासून ते अन्न सुरक्षा योजनेपर्यंत काहीच ठाऊक नसते
रेमडेसिव्हीरसाठी धावाधाव करू नका!
मुंबईच्या डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ
गुजरात एटीएस, तटरक्षक दलाची दमदार कामगिरी
सर्व जिल्ह्यात बाहेरच्या राज्यांतून येणाऱ्या मजूरांची कोविड चाचणी केली जाणार आहे. आरटीपीसीआर चाचणीचा अहवान निगेटिव्ह आल्यानंतर मगच त्यांना त्यांच्या इच्छित ठिकाणी जाता येणार आहे. अन्यथा त्यांना कोविड केंद्रात विलगीकरणात रहावे लागणार आहे.
त्याबरोबरच, या सर्व मजूरांची नोंदणी करण्याचे देखील आदेश योगी सरकारने दिले आहेत. त्यात त्याच्या कौशल्याची देखील नोंद घेतली जाणार आहे. त्यांच्या कौशल्यानुसार मजूरांना त्यांच्या स्थानिक शहरातच काम उपलब्ध करून देण्याचा योगी सरकारचा प्रयत्न असणार आहे.