अमेरिकेच्या भूमीचा वापर भारताविरुद्धच्या दहशतवादी कारवायांसाठी केला जात असल्याची माहिती अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीतील प्रतिष्ठित भारतीय अमेरिकी नागरिकांच्या गटाने न्याय विभाग, एफबीआय आणि पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यांच्यासोबत घेतलेल्या विशेष बैठकीत या मुद्द्याकडे प्राधान्याने लक्ष वेधण्यात आले.
कॅलिफोर्नियातील हिंदूंविरुद्ध वाढत्या द्वेषाच्या गुन्ह्यांसंदर्भात या गटाने वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. खलिस्तानच्या मुद्दा त्यांच्यापुढे मांडण्यात आला असता, त्यांना हा संदर्भ नीटसा समजला नाही. त्यामुळे या विषयावर आम्हाला अधिक जाणून घ्यावे लागेल, असे या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. अमेरिकेत कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करू शकत नसल्याबद्दल भारतीय अमेरिकी वंशाच्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर या संदर्भात अमेरिकेच्या न्याय विभागाच्या मार्गदर्शनानुसार, एक कार्यगट तयार केला जाईल, असा निर्णय घेण्यात आला. हा कार्यगट प्रार्थनास्थळांवरील सुरक्षा उपायांचा सक्रियपणे पाठपुरावा करेल आणि कोणत्याही बेकायदा कृत्याचा पद्धतशीर अहवाल सादर करेल, असे निश्चित झाले आहे. या कार्यगटात भारतीय समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधींचा समावेश करण्यात येणार आहे.
हिंदू आणि जैन प्रार्थनास्थळांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे निराकरण करण्यासाठी समाजाचे नेते अजय जैन भुतोरिया यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यात सुमारे दोन डझन प्रतिष्ठित भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक उपस्थित होते.
‘डिपार्टमेंट ऑफ जस्टिस कम्युनिटी रिलेशन्स सर्व्हिस’चे व्हिन्सेंट प्लेअर आणि हरप्रीत सिंग मोखा तसेच एफबीआयचे अधिकारी आणि सॅन फ्रान्सिस्को, मिलपिटास, फ्रीमॉन्ट आणि नेवार्कच्या पोलीस विभागातील अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांविरुद्ध आणि विशेषतः हिंदूंच्या विरोधात द्वेषपूर्ण गुन्ह्यांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे समुदायामध्ये खूप भीती आणि चिंता निर्माण झाली आहे, असे भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांनी सांगितले. या बैठकीत पत्रकारांना मज्जाव करण्यात आला होता.
समाजात सध्या भीतीचे वातावरण आहे. खलिस्तानी लोक शाळा आणि भारतीय किराणा दुकानाबाहेर ट्रक पार्क करतात आणि तरुण भारतीय अमेरिकन लोकांना धमकावतात. सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावास जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरही कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा कोणतीही कारवाई करू शकल्या नाहीत. खलिस्तानी समर्थक भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना उघडपणे धमकावत आहेत आणि दहशतवादी कृत्यांना उघडपणे प्रोत्साहन देत आहेत, असा संताप अनेकांनी व्यक्त केला.
हे ही वाचा:
निवडणूक रोख्यांत पैसे देणाऱ्यांत अदानी-अंबानींचा समावेश नाही
ममता बॅनर्जी जखमी, डोक्याला गंभीर दुखापत
राहुल गांधींनी विठ्ठलमूर्ती स्वीकारण्यास केली टाळाटाळ; व्हीडिओ व्हायरल
पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदीच सक्षम!
वरिष्ठ कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांना अमेरिकेतील खलिस्तान चळवळीची माहिती नव्हती आणि अमेरिकेतील या दहशतवादी गटाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी भारतीय अमेरिकन नागरिकांनी त्यांना मदत करावी, अशी त्यांची इच्छा आहे, असे या बैठकीत सहभागी असलेल्या काही नागरिकांनी सांगितले. तसेच, संसाधने आणि निधीच्या कमतरतेमुळे त्यांनी याबाबत काम करण्यास असमर्थता दर्शवली. त्यांच्यासमोर अन्य सर्वोच्च प्राधान्येही आहेत, असेही ते म्हणाले.