येमेनमधील हौथी तळांवर अमेरिका, ब्रिटनचे हवाईहल्ले!

गेल्या १२ दिवसांतील हा आठवा हल्ला

येमेनमधील हौथी तळांवर अमेरिका, ब्रिटनचे हवाईहल्ले!

लाल समुद्रातून जाणाऱ्या मालमाहू जहाजांचा मार्ग अडवण्याची धमकी दिल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि ब्रिटनने सोमवारी रात्री येमेनमधील इराणसमर्थक हौथी गटाच्या आठ तळांवर संयुक्तपणे हवाई हल्ले केले. गेल्या १२ दिवसांतील हा आठवा हल्ला आहे. यावेळी हौथी गटाने भुयारांत केलेली गोदामे आणि क्षेपणास्त्र व हेरगिरी यंत्रणांशी संबंधित ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले, असे अमेरिका आणि ब्रिटनने ऑस्ट्रेलिया, बहारिन, कॅनडा आणि नेदरलँड यांच्यासह प्रसृत केलेल्या निवेदनातून जाहीर केले आहे.

जागतिक व्यापाराचा धोका उत्पन्न करण्यासाठी आणि जहाजांवरील निष्पाप कर्मचाऱ्यांना धमकावणाऱ्या हौथी दहशतवाद्यांची क्षमता नेस्तनाबूत करण्यासाठी हे हल्ले केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हौथी गट सातत्याने बेकायदा आणि धोकादायक कृत्य करत आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.तर, येमेनच्या अधिकृत साबा वृत्तसंस्थेनुसार, अमेरिका आणि ब्रिटिश दलाने सना या राजधानी शहरावर हवाई हल्ले केल्याचा दावा केला आहे. तर, बंडखोरांचे वर्चस्व असलेल्या राजधानीच्या उत्तर भागातील अल दाईलामी लष्करी तळावर चार हवाईहल्ले झाल्याचे एका वृत्तवाहिनीने सांगितले आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्री योगी म्हणाले- ज्या ठिकाणी संकल्प केला होता, त्याच ठिकाणी राम मंदिर बांधले!

मोदींकडून कामगारांवर पुष्पवर्षाव!

पंतप्रधान मोदींच्या रूपाने ‘श्रीमंत योगी’ प्राप्त झाले आहेत

पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडला प्रभू रामांचा अभिषेक सोहळा!

लाल समुद्रातील व्यापारी जहाजांना अडथळा आणला जात असल्याने अमेरिका आणि ब्रिटनने १२ जानेवारी रोजी हौथी दहशतवाद्यांवर हवाई हल्ले केले होते. तर, सोमवारी येमेन किनाऱ्यावरील अमेरिकेच्या लष्करी मालवाहू विमानावर हल्ला केल्याचा दावा हौथी गटाने केला होता.इस्रायलच्या गाझा पट्टीतील हल्ल्याचा निषेध म्हणून हौथी गटाने लाल समुद्रातील व्यापारी जहाजांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे.

याआधी सोमवारी, अमेरिकेने सांगितले की, ११ जानेवारी रोजी हौथीसांठी असलेली इराणी शस्त्रे जप्त करण्याच्या मोहिमेदरम्यान बेपत्ता झालेल्या नौदलाच्या दोन पथकांना आता मृत मानले गेले आहे. त्यामुळे या संघर्षात पहिल्यांदाच अमेरिकेची जीवितहानी झाली आहे. हे सैन्यदल जप्त केलेली क्षेपणास्त्रे घेऊन जात असताना त्यांची बोट सोमालियाच्या किनाऱ्याजवळ बुडाल्याचे सांगितले जात आहे.

Exit mobile version