अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी तालिबानशी झालेल्या ‘डील’वर पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. “तालिबानी संगठना शांतता करारांतर्गत खरोखरच अफगाणिस्तानमधील दहशतवादी हल्ले थांबवतायत का? याकडे पाहणे गरजेचे आहे.” अशी माहिती बायडन सरकारमधील अधिकाऱ्यांनी दिली.
अमेरिकेने सप्टेंबर २०२० मध्ये कतार येथे तालिबानशी शांतता करार केला होता. या करारामुळे अमेरिकेला अफगाणिस्तानमधील सैन्य काढून घेता येईल. करारात, तालिबान दहशतवादी हल्ले थांबवेल आणि अफगाणिस्तानमधील सरकारशी शांती संवाद सुरु करेल अशा अटी होत्या. परंतु, सप्टेंबर २०२० मध्ये झालेल्या या बैठकीनंतरही अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले सुरूच आहेत.
अमेरिकेचे लक्ष शांतता करारांतर्गत तालिबान काम करत आहे का नाही हे पाहण्याकडे आहे. करारात मान्य केल्या प्रमाणे तालिबान, दहशतवादी गटांशी असलेले संबंध संपवून अफगाण सरकारशी चर्चेला तयार होणार का? याकडेही अमेरिकेचे लक्ष आहे.
अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानातून परत गेल्यास अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा अनागोंदी माजेल, शिवाय पाकिस्तान सरकारला आणि सैन्याला दहशतवादी संगठनांशी असलेल्या चांगल्या संबंधांमुळे अफगाणिस्तानच्या राजकारणात ढवळाढवळ करायलाही वाव मिळेल. अशी माहिती आंतरराष्ट्रीय विषयातील तज्ज्ञांनी दिली आहे.
अफगाणिस्तान सरकारकडून, अमेरिकेच्या शांती कराराच्या पुनर्विचार करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.