अमेरिकेने येमेनमध्ये हुती दहशतवाद्यांविरोधात पुन्हा एकदा हवाई हल्ला केला आहे. अमेरिकेने नुकत्याच केलेल्या हल्ल्यात लाल समुद्रात हुती गटाची तीन जहाजविरोधी क्षेपणास्त्रे नष्ट झाली आहेत. लाल समुद्रात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी लष्कराने स्वसंरक्षणासाठी प्रत्युत्तरादाखल हल्ला केला, असे निवेदन वॉशिंग्टनमध्ये व्हाइट हाऊसने प्रसिद्ध केले आहे. अमेरिकी लष्कराने येमेनमधील हुती तळांवर तीन यशस्वी हल्ले केल्याचे व्हाइट हाऊसतर्फे सांगण्यात आले.
जहाजविरोधी क्षेपणास्त्रे व्यापारी जहाज आणि अमेरिकी नौदलाच्या जहाजाला लक्ष्य करण्याच्या तयारीत असताना अमेरिकेने त्यांच्यावर शुक्रवारी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास हल्ला केला आणि ती क्षेपणास्त्रे नष्ट केली, अशी माहिती यूएस सेंट्रल कमांडने दिली. या कारवाईमुळे अमेरिकी नौदलाची जहाजे आणि व्यापारी जहाजे यांचा समुद्रातील प्रवास निर्धोक होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
हुती गटाने केला होता क्षेपणास्त्रहल्ला
याआधी अमेरिकी मध्य कमांडने सांगितल्यानुसार, इराणसमर्थित हुती गटाने अमेरिकेच्या केम रेंजर जहाजावर दोन जहाजविरोधी क्षेपणास्त्रे डागली होती. मात्र यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही. त्यानंतर अमेरिकेनेही हुती गटाच्या तळांना लक्ष्य केले.
हे ही वाचा:
२२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर!
नोएडामध्ये एअर इंडिया कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या!
बिल्किस बानोप्रकरणी रविवारपर्यंत आत्मसमर्पण करा!
इस्रायलमध्ये बांधकाम विभागाकरिता भारतीय कामगारांची भरती मोहीम हरियाणात सुरु!
इस्रायलने गाझा पट्टीत हमासविरोधात युद्ध पुकारल्यानंतर पॅलिस्टिनी नागरिकांच्या समर्थनार्थ हुती गटाने लाल समुद्रात इस्रायलच्या जहाजांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे या समुद्रातून ये-जा करणाऱ्या जहाजांच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे. तर, जहाजांवरील हल्ले न थांबल्यास अमेरिकाही हुती विद्रोही गटाविरोधातील कारवाई तीव्र करेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दिला आहे.