दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेने शुक्रवारी अभ्यासक्रमातील विविध बदलांना मंजुरी दिली. त्यामध्ये ‘सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा’ हे लोकप्रिय गीत लिहिणारे कवी मोहम्मद इक्बाल यांना पॉलिटिकल सायन्सच्या बीएच्या अभ्यासक्रमातून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिषदेने फाळणी, हिंदू अभ्यासक्रम आणि आदिवासी अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
इक्बाल हे भारतीय उपखंडातील प्रमुख उर्दू आणि फारसी कवी आहेत. ते पाकिस्तानचे राष्ट्रीय कवी होते. पाकिस्तानच्या स्थापनेमागे त्यांच्या विचारांचेही योगदान असल्याचे मानले जाते. शुक्रवारी झालेल्या शैक्षणिक समितीच्या परिषदेमध्ये विविध अभ्यासक्रम आणि केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
‘फाळणी, हिंदू आणि आदिवासींच्या अभ्यासासाठी केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. इक्बाल यांच्या विचारांना पॉलिटिकल सायन्सच्या ‘आधुनिक भारतीय राजनैतिक विचार’ या पेपरमध्ये स्थान देण्यात आले होते. परिषदेने सादर केलेल्या प्रस्तावांना विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या मंजुरीची आवश्यकता आहे. ही मंजुरी ९ जूनला मिळेल.
हे ही वाचा:
पाण्यात पडलेला फोन काढण्यासाठी २१ लाख लीटर पाणी काढून टाकले, अधिकारी निलंबित
एनआयएने केली यासिन मलिकच्या फाशीची मागणी
संसद भवनविरोधींची कृती बालिशपणाची!
दीड हजार कोटींचे अमली पदार्थ केले नष्ट
अभाविपने केले स्वागत
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या दिल्ली शाखेने इक्बाल यांना अभ्यासक्रमातून वगळण्याच्या प्रस्तावाचे स्वागत केले आहे. ‘जिना यांना मुस्लिम लीगचे नेता म्हणून स्थापन करण्यात मोहम्मद इक्बाल यांची प्रमुख भूमिका होती. फाळणीला जितके जिना जबाबदार होते, तितकेच इक्बालही,’ असे एबीव्हीपीने प्रसृत केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पाच सदस्यांचा विरोध
दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेचे १०० हून अधिक सदस्य आहेत. इक्बाल यांना अभ्यासक्रमातून वगळण्याबाबत त्यांनी दिवसभर चर्चा केली. त्यातील किमान पाच सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध केला. ‘हा अभ्यासक्रम दुफळी निर्माण करणारा आहे. आता विद्यापीठात १३०० वर्षांपूर्वीचे आक्रमण, छळ आणि गुलामीचा अभ्यास करेल,’ अशी टीका या सदस्यांनी केली आहे.