भारताच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी २०२१ रोजी दिल्लीतील राजपथावर साक्षात रामराज्य अवतरणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात उत्तर प्रदेश राज्याचा चित्ररथ अयोध्या साकारली जाणार आहे. या चित्ररथात अयोध्येच्या भव्य श्री राम मंदिराची प्रतिकृती तसेच रामायणातील विविध प्रसंग साकारले जाणार आहेत.
प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत होणारे संचालन हा कायमच आकर्षणाचा विषय असतो. दार वर्षी या संचलनात वेगवेगळ्या राज्यांतर्फे आपापले चित्ररथ सादर केले जातात. या चित्ररथाच्या माध्यमातून त्या त्या राज्याची संस्कृती जगासमोर मांडली जाते. या वर्षी उत्तर प्रदेश राज्याचा चित्ररथ हे प्रजासत्ताक दिनाचे विशेष आकर्षण असणार आहे. या चित्ररथावर अयोध्येतील राम मंदिर साकारले जाणार आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रसिद्धीपत्रकानुसार या चित्ररथाद्वारे “अयोद्धेचे प्राचीन सांस्कृतिक वैभव, संस्कार आणि सौंदर्य दाखवले जाणार आहे.” या चित्ररथात सुरवातीला महर्षी वाल्मिकी रामायण लिहीतानाची प्रतिकृती असणार आहे. तर मध्यभागी भव्य राम मंदिराची प्रतिकृती असणार आहे. या सोबतच रामायणातील अनेक प्रसंग रंगवले जाणार आहेत. यात शबरीची बोरं खाण्याचा प्रसंग, अहिल्याची शापमुक्ती, संजीवनी बुटी घेऊन येणारे हनुमान, केवट संवाद, जटायू-राम संवाद, अशोक वाटिका इत्यादी प्रसंग दिसणार आहेत. यासोबतच अयोध्येचा जगप्रसिद्ध दीपोत्सव देखील साकारण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालानंतर अयोध्येत भव्य श्रीराम मंदिर निर्माण होणार आहे ज्याचे भूमिपूजन गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले होते. सध्या देशभर राम मंदिरासाठी निधी संकलन कार्यक्रम सुरु असून त्याला देशभरातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.