बांगलादेशात चिन्मय प्रभू यांच्या अटकेविरोधात निदर्शन करणाऱ्या हिंदू समुदायावर अज्ञातांकडून हल्ला

ढाका पोलिसांच्या डिटेक्टिव्ह ब्रँचकडून कारवाई

बांगलादेशात चिन्मय प्रभू यांच्या अटकेविरोधात निदर्शन करणाऱ्या हिंदू समुदायावर अज्ञातांकडून हल्ला

बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात निदर्शने करणारे प्रमुख साधू चिन्मय प्रभू यांच्या अटकेनंतर तेथील परिस्थिती बिघडत चालली आहे. चिन्मय प्रभू यांच्या अटकेविरोधात हिंदू समाज रस्त्यावर उतरला आहे. ढाका आणि बांगलादेशच्या इतर भागांमध्ये हिंदू समाजाने चिन्मय प्रभू यांच्या अटकेविरोधात निदर्शने सुरू केल्यानंतर अज्ञात लोकांनी त्यांच्यावर हल्ला केल्यानंतर अनेक लोक जखमी झाले आहेत. हिंदूंवरील अत्याचाराविरोधात निदर्शने करणारे प्रमुख साधू चिन्मय प्रभू यांना ढाका पोलिसांच्या डिटेक्टीव्ह ब्रँचने सोमवारी (२५ नोव्हेंबर) ढाका विमानतळावर अटक केली. यानंतर ढाका, चितगाव आणि इतर भागांमध्ये चिन्मय प्रभू यांच्या अटकेविरोधात निदर्शने करण्यात आली.

ढाका शहरामध्ये हिंदू समुदायाच्या लोकांनी शाहबाग परिसरात निदर्शने केली. अनेक लोकांनी एकत्र जमून नारेबाजी करत प्रभू यांच्या तात्काळ सुटकेच्या मागणीसाठी प्रमुख रस्ते देखील रोखून ठेवले होते. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना (इस्कॉन) च्या सदस्यांनीही चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेचा निषेध केला. अशातच आंदोलनादरम्यान अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले. चितगावमध्येही लोकांनी प्रभू यांच्या अटकेविरोधात निदर्शने केली. दरम्यान, भाजप खासदार सुकांता मजुमदार यांनी चिन्मय कृष्ण प्रभू यांच्या अटकेचा निषेध केला आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीची पावले उचलत यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी केली.

चिन्मय प्रभू यांनी शुक्रवार, २२ नोव्हेंबर रोजी बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ रंगपूर येथे मोठ्या निषेध रॅलीला संबोधित केले होते. बांगलादेशातील पुंडरिक धामचे अध्यक्ष चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी हे बांगलादेशात भगवा ध्वज फडकावल्याबद्दल देशद्रोहाचा आरोप असलेल्या १८ जणांपैकी एक होते.

हे ही वाचा : 

जलेबी-फाफडा विरुद्ध उद्धव ठाकरे बापडा

थोडी लाज शिल्लक असेल तर तोंड काळे करा…

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणारे साधू चिन्मय प्रभू यांना अटक

तेलंगणाने अदानी समूहाचा निधी नाकारला

विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर तत्कालीन पंतप्रधान हसीना शेख यांनी भारतात आश्रय घेतला. त्यानंतर न्यू मार्केट चौकात बसवण्यात आलेल्या खांबावरून राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. २५ ऑक्टोबर रोजी सनातन जागरण मंचाच्या निषेधादरम्यान, ब्रह्मचारी आणि इतरांनी बांगलादेशच्या ध्वजावर भगवा ध्वज लावला होता. ध्वजाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर भगवा ध्वज काढण्यात आला. आरोपपत्रात ब्रह्मचारी आणि इतरांवर राष्ट्रध्वजाचा अवमान करून देशद्रोह केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. देशाचे सार्वभौमत्व कमकुवत करण्याचा आणि अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

Exit mobile version