आठवड्याभरापासून इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये भीषण युद्ध सुरू आहे. गेल्या शनिवारी गाझा पट्टीतून हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या भूमीवर रॉकेट हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने युद्धाची घोषणा करत हल्ले करायला सुरुवात केली. हमास दहशतवाद्यांनी इस्रायली भूमीत शिरून सामान्य नागरिकांची कत्तल सुरू केली. अनेक महिलांचे अपहरण करून त्यांना ओलीस ठेवलं. शिवाय लहान लहान मुलांनाही त्यांनी सोडले नाही. हमासच्या या अत्याचारांना इस्रायलकडून सडेतोड उत्तर देण्यात येत असून आता इस्रायलनं प्रतिहल्ला अधिक तीव्र केला आहे.
दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या गाझा पट्टीतील एका कर्मचाऱ्याचा भावनिक संदेश सध्या व्हायरल होत आहे. यामुळे इस्रायल आणि गाझा पट्टीमधील वास्तव समोर आले आहे. युएनच्या अधिकृत एक्स हँडलवर हा संदेश पोस्ट करण्यात आला आहे. तसेच, युद्धशांतीचं आवाहनही करण्यात आलं आहे.
यूएनच्या पोस्टवरून हा एक व्हॉट्सअॅप संदेश असल्याचे दिसून येत आहे. पोस्टमध्ये पाठवणाऱ्या व्यक्तीचे नाव Helen/Gaza असं नमूद करण्यात आले आहे. “तिथे परिस्थिती कशी आहे? तुम्ही सुरक्षित आहात का?” असा प्रश्न केला असता त्यावर उत्तरादाखल हेलन यांनी गाझा पट्टीतील भीषण स्थिती सांगितली आहे.
“मरण पावलेलेही आमच्यासोबतच आहेत आणि जे जिवंत आहेत ते. आम्ही वारंवार स्वत:ला आणि एकमेकांना सांगत असतो की सगळ्यांनी एकत्र एका खोलीत राहायला हवं. जर आपण या हल्ल्यात मारले गेलो, तर एकत्रच मरुयात. पण खरं सांगायचं तर आमच्यापैकी कुणीच व्यवस्थित नाही. जे मरण पावलेत, तेही आमच्यासोबतच आहेत आणि उरलेले आम्ही जे जिवंत आहोत तेही खरंतर मेलेलोच आहोत,” असं भावनिक उत्तर देण्यात आलं आहे.
“आमची ईश्वराकडे प्रार्थना आहे की त्याने सगळ्यांचे रक्षण करावे. आम्हाला थोड्याफार जखमा झाल्या आहेत. पण इथे त्यांनी आख्खा चौकच बॉम्बफेक करून उद्ध्वस्त केला आहे. इथे प्रेतांचा खच पडला आहे,” असंही ते पुढे म्हणाले. “हे ईश्वरा, कृपया आमची मदत कर. जर आमच्या नशिबी मरणच लिहिलं असेल, तर कृपा करून ते मरण लवकर येऊ दे,” असं मागणं या संदेशात करण्यात आलं आहे.
"Please help us"
The situation in the📍#GazaStrip is unbearable. These are the messages we’re receiving from our @UNRWA colleagues.#HearTheirVoices pic.twitter.com/S7KLKYyfaP
— UNRWA (@UNRWA) October 15, 2023
हे ही वाचा:
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचा नुखबा फोर्सचा सर्वोच्च कमांडर ठार!
भवानी शक्तीपीठ हे संस्कारांचे उर्जा केंद्र
गोलंदाज एल. शिवरामकृष्णनने केले राजदीपला त्रिफळाचीत!
पॅलेस्टाइनवरून तस्लिमा नसरिन यांनी बांगलादेशवासियांना सुनावले
हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलयनं हमासविरुद्ध युद्धाची घोषणा केली. नुकचाच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गाझा आणि आसपासच्या नागरिकांना दक्षिण गाझा भागात स्थलांतर करण्याचे निर्देश दिले आहेत.