२६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणाऱ्या हाफिज भुट्टावीच्या मृत्युच्या वृत्ताला युएनचा दुजोरा

२६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणाऱ्या हाफिज भुट्टावीच्या मृत्युच्या वृत्ताला युएनचा दुजोरा

मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारा लश्कर-ए-तैयबाचा संस्थापक सदस्य हाफिज अब्दुल सलाम भुट्टावी याच्या मृत्यूवर संयुक्त राष्ट्राने शिक्कामोर्तब केले आहे. भुट्टावी हा हाफिज सईदचा निकटचा साथीदार आणि त्याचा डेप्युटीही होता.

दहशतवादी हाफिज अब्दुल सलाम भुट्टावी याचा मृत्यू २९ मे, २०२३ रोजी झाला होता. मात्र, संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्या वेबसाइटवर अधिकृतरीत्या या वृत्ताला दुजोरा दिला नव्हता. आता मात्र या मृत्यूच्या वृत्तावर संयुक्त राष्ट्राने शिक्कामोर्तब केले आहे. पंजाब प्रांतात पाकिस्तान सरकारच्या कोठडीत असताना त्याचा मृत्यू झाला होता.

पाकिस्तानच्या मुरीदके भागात लश्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाची स्थापना करणारा भुट्टावी प्रतिबंधित दहशतवादी संघटना जमात-उद-दावाचा प्रमुख आणि मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याचा डेप्युटी होता. जमात-उद-दावा ही लश्कर-ए-तैयबाची प्रमुख दहशतवादी संघटना आहे. ७७ वर्षीय भुट्टावी याला दहशतवादी संघटनांना निधी पुरवल्याप्रकरणी ऑक्टोबर २०१९मध्ये लाहोरपासून सुमारे ६० किमी दूर असलेल्या जिल्ह्यातील शेखुपुरा तुरुंगात कैद करण्यात आले होते.

हे ही वाचा:

धक्कादायक! शरद मोहोळच्या हत्येची वकिलांना होती माहिती

गावातून पळून गेलेले जोडपे मुलासह पुन्हा परतले, तिघांची गोळ्या घालून केली हत्या!

अजित पवार जाणार अयोध्येला, निमंत्रण मिळाले!

कॉंग्रेसने राम मंदिर निमंत्रण नाकारून पापक्षालनाची संधी गमावली

२९ मे रोजी त्याच्या छातीत दुखू लागले आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे पोहोचल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले. जेव्हा हाफिज सईद याला ताब्यात घेण्यात आले, तेव्हा भुट्टावी याने किमान दोनवेळा ‘लश्कर’आणि ‘जमात’च्या प्रमुखाची जबाबदारी सांभाळली होती. ‘भुट्टावी याने नोव्हेंबर २००८मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना तयार करण्यात मदत केली होती. मुंबई हल्ल्यात १५०हून अधिक जण ठार झाले होते,’ असे संयुक्त राष्ट्राच्या वेबसाइटवर नमूद करण्यात आले आहे.

Exit mobile version