युएन प्रमुखांकडून इस्रायल- हमासमध्ये युद्धविराम करण्याची मागणी

आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे नमूद

युएन प्रमुखांकडून इस्रायल- हमासमध्ये युद्धविराम करण्याची मागणी

गाझा पट्टीतील हमास या दहशतवादी संघटनेने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझा पट्टीवर हल्ला केला आहे. या युद्धात प्रचंड रक्तपात होत असून हजारो निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्र संघटनेचे (युएन) प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी युद्धविराम करण्याची मागणी केली आहे.

मंगळवार, २४ ऑक्टोबर रोजी १५ सदस्यीय संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसमोर बोलताना गुटेरेस यांनी नागरिकांचे संरक्षण करण्याची विनंती केली आहे. तसेच इशारा दिला आहे की, या लढाईमुळे या प्रदेशात आणखी युद्ध तीव्र होण्याचा धोका आहे. त्यामुळे त्यांनी युद्धविराम करण्याची मागणी केली आहे. इस्रायल आणि पॅलेस्टिनी सशस्त्र गट हमास यांच्यातील युद्धात आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हमासने केलेले हल्ले शून्यातून झाले नाहीत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. पॅलेस्टिनी लोकांना ५६ वर्षांपासून गुदमरून टाकणारा त्रास सहन करावा लागला आहे, असेही गुटेरेस म्हणाले. पॅलेस्टिनी लोकांच्या तक्रारी हमासच्या भयंकर हल्ल्यांचे समर्थन करू शकत नाहीत आणि हे भयंकर हल्ले पॅलेस्टिनी लोकांच्या सामूहिक शिक्षेचे समर्थन करू शकत नाहीत, असेही त्यांनी नमूद केले. गुटेरेस यांनी इस्रायलचे नाव न घेता टीका केली आहे.

हे ही वाचा:

इस्रायली नागरिकाला बंदी बनवण्यासाठी हमासची ‘ऑफर’!

गरबा खेळताना भोवळ येवून तरुणाचा मृत्यू!

‘प्रधानमंत्री स्वनिधी’चा लाभ लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा

तालिबानला खुपतोय अफगाणिस्तानचा विजय

हल्ल्यानंतर, इस्रायलने गाझापट्टीतील २३ लाख रहिवाशांना पाणी, अन्न, इंधन आणि वीजपुरवठा बंद केला आहे या कृतीला संयुक्त राष्ट्राने सामूहिक शिक्षेचे स्वरूप म्हटले आहे. कमीतकमी ५ हजारहून अधिक लोक इस्त्रायलच्या हल्ल्यात मारले गेले आहेत. इस्रायलने उत्तर गाझामधील रहिवाशांना दक्षिणेकडे स्थलांतरित होण्याचे आदेश दिल्यामुळे दहा लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत, परंतु संपूर्ण प्रदेशात इस्रायली हवाई हल्ले सुरूच आहेत.

Exit mobile version