काली मातेच्या त्या फोटोवरून युक्रेनने टेकले गुडघे

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या ट्विटवर आक्षेपार्ह फोटो शेअर करण्यात आला होता.

काली मातेच्या त्या फोटोवरून युक्रेनने टेकले गुडघे

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या ट्विटवर हिंदू देवी काली मातेचा आक्षेपार्ह फोटो शेअर करण्यात आला होता. त्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. देशभरात संतापाची लाट उसळली होती. युक्रेनने यासंदर्भात माफी मागावी अशी मागणी देखील करण्यात आली होती. त्यानंतर युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने संबंधित फोटो डिलीट केला होता. मात्र, माफी मागितली नव्हती. दरम्यान, युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार उपमंत्र्याने या प्रकरणी आता दिलगीरी व्यक्त केली आहे.

युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार प्रथम उपमंत्री एमीन झेपर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. “युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या ट्विटवर हिंदू देवी काली मातेच्या मूर्तीची खंडित प्रतिमा सादर केल्याबद्दल आम्हाला खेद होत आहे. युक्रेन आणि तेथील लोक भारतीय संस्कृतीचा आदर करतात आणि भारताच्या समर्थनाची प्रशंसा करतात. तो आक्षेपार्ह फोटो आधीच काढून टाकण्यात आला आहे.” असे ट्विट त्यांनी केले आहे.

काय आहे प्रकरण?

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक स्फोटाचा फोटो शेअर केला होता. याला ‘वर्क ऑफ आर्ट’ असं कॅप्शन देण्यात आलं होतं. हा फोटो हिंदू देवता काली मातेशी साम्य असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर युक्रेनवर सर्वच स्तरावरून टीका करण्यात आली होती. यानंतर संबंधित ट्वीट डिलीट करण्यात आले.

हे ही वाचा:

लखनऊमध्ये गंभीर-विराट भांडण, दंडाची शिक्षा

गँगस्टर- राजकारणी मुख्तार अन्सारीचा भाऊ अफजल अन्सारीची खासदारकी रद्द!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गाव प्रमुखाला अटक

अभेद्य सिंधुदुर्ग यंदा नौदल दिनाचा सोहळा अनुभवणार!

याप्रकरणी, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वरिष्ठ सल्लागार कांचन गुप्ता यांनी ट्विटरवर आपलं मत मांडलं होते. ‘अलीकडेच युक्रेनचे उप परराष्ट्र मंत्री भारताकडून पाठिंबा मागण्यासाठी दिल्लीत आले होते. पण युक्रेन सरकारचा खरा चेहरा समोर आला आहे. हा जगभरातील हिंदूंच्या भावनांवर केलेला आघात आहे,’ अशी टीका त्यांनी केली होती.

Exit mobile version