भारताच्या जी २० अध्यक्षपदाशी संबंधित पैलूंवर चर्चा करण्यासाठी सोमवार, ५ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक मुख्यमंत्र्यांसह देशभरातील नेते सहभागी झाले होते. मात्र, महाराष्ट्राचे नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी या बैठकीला दांडी मारली होती.
या बैठकीला जे.पी. नड्डा, मल्लिकार्जुन खरगे, ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, अरविंद केजरीवाल, वाय.एस. जगन मोहन रेड्डी, सीताराम येचुरी, चंद्राबाबू नायडू, एम.के. स्टॅलिन, एडप्पाडी के. पलानीस्वामी, पशुपतीनाथ पारस, एकनाथ शिंदे आणि के. एम. कादर मोहिद्दीन तसेच अमित शहा, निर्मला सीतारामन, राजनाथ सिंह, डॉ. एस. जयशंकर, पियुष गोयल, प्रल्हाद जोशी, भूपेंद्र यादव आणि माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचाही समावेश होता. या बैठकीला शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे अनुपस्थित होते. जी २० च्या बैठकीला बोलावले असतानाही उद्धव ठाकरे बैठकीला गेले नाहीत. त्याउलट इथे महाराष्ट्रात मोर्चा काढण्याच्या निर्णयावर त्यांनी बैठक घेतली.
या बैठकीमध्ये अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. भारताचे जी २० अध्यक्षपद संपूर्ण देशाचे आहे. संपूर्ण जगाला भारताची ताकद दाखवण्याची ही एक अनोखी संधी असल्याचे यावेळी मोदी म्हणाले आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले, आज जागतिक स्तरावर भारताविषयी उत्सुकता आणि आकर्षण आहे, ज्यामुळे भारताच्या जी २० अध्यक्षपदाची क्षमता आणखी वाढली आहे. जी २० अध्यक्षपद भारताच्या काही भागांना पारंपारिक मेगासिटीच्या पलीकडे प्रदर्शित करण्यात मदत करेल आणि देशाच्या प्रत्येक भागाचे वेगळेपण समोर आणेल.
तसेच त्यावेळी मोदींनी टीम वर्कवर भर दिला आहे. जी २० संदर्भात कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सर्व नेत्यांचे त्यांनी सहकार्य मागितले आहे. जी २० बैठका आयोजित केल्या जातील त्या ठिकाणच्या पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यात येईल, असंही पंतप्रधान मोदींनी नमूद केले आहे.
हे ही वाचा:
बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील गाड्यांवर केला हल्ला
‘बाबासाहेबांच्या संविधानामुळेचं मी मुख्यमंत्री झालो’
पाकिस्तानशी चर्चा नाहीच, भारताची भूमिका
एक्झिट पोलनुसार गुजरात, हिमाचलमध्ये भाजपाचा बोलबाला
उदयपूरमध्ये सुरू असलेल्या जी २० बैठकीच्या तिसऱ्या दिवशी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. त्याचबरोबर काल दुसऱ्या दिवशी डिजिटल अर्थव्यवस्था, आरोग्य आणि शिक्षण या विषयांवर कार्यरत गटाशी तांत्रिक बदलांवर चर्चा करण्यात आली.