उदय लळीत यांना महत्त्वाची जबाबदारी
सिंधुदुर्गवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सिंधुदुर्गातील देवगड येथील उदय लळीत आता भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान होणार आहेत. २७ ऑगस्ट रोजी ते भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ए.व्ही. रमणा यांचा कार्यकाळ लवकरच संपणार असून, त्यांच्या जागी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय लळीत यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ते देवगड तालुक्याचे सुपुत्र असून गिर्ये-कोठारवाडी येथे त्यांचं मूळ घर आहे.
हायप्रोफाईल केसेसमध्ये सहभाग
विशेष सरकारी वकील असलेले उदय लळीत यांनी गेल्या काही वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात हायप्रोफाईल प्रकरणे चालवली असूनही ते प्रसिद्धीपासून दूर आहेत. ८० हजार पानांच्या कागदपत्रांचा डोंगर सांभाळत त्यांनी ‘2जी स्पेक्ट्रम’ हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा भ्रष्टाचार खटला चालवला. एवढेच नाही तर सीबीआय, ईडीच्या वतीने अभियोगाची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती.
लळीत यांचे पिढीजात वकिली घराणे…
लळीत यांचे आजोबा, ४ काका, वडील वकिली करायचे. जून १९८३ मध्ये त्यांनी वकिलीला सुरुवात केली. मुंबई येथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर उदय लळीत यांनी ज्येष्ठ दिवंगत वकील एम. ए. राणे यांच्याकडे सुरुवातीची काही वर्षे वकिली केली. दिल्ली येथे सहा वर्ष त्यांनी ज्येष्ठ विधिज्ञ सोली सारोबजी यांचे सहकारी म्हणून काम पाहिले.