मध्य प्रदेशमधील कुनो राष्ट्रीय उद्यानाजवळील गावात एका वृद्ध दाम्पत्याने आपल्या दोन वर्षीय नातीला बिबट्यापासून वाचवल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री बिबट्याने या दाम्पत्याच्या नातीवर हल्ला केला होता, त्यावेळी बिबट्याच्या जबड्याच्या पकडीतून त्यांनी नातीची सुटका केली.
गुरुवारी रात्री ५० वर्षीय बसंतीबाई गुर्जर या त्यांच्या पती आणि नातीसोबत घरामागील अंगणात झोपल्या असताना हा बिबट्या तिथे पोहचला. नातीच्या रडण्याचा आवाज ऐकून बसंतीबाई यांना जाग आली आणि त्यांनी पाहिले की त्यांच्या नातीचा उजवा पाय हा बिबट्याच्या तोंडात असून बिबट्या त्या लहानगीला खेचत आहे. समोरचे दृश्य पाहताच त्यांनी बिबट्याच्या तोंडावर लाथा मारायला सुरुवात केली पण बिबट्याची पकड सुटेना. दरम्यान बसंतीबाई यांचे पती जयसिंग गुर्जर यांना पत्नीच्या आणि नातीच्या आरडाओरड्यामुळे जाग आली. संपूर्ण शक्तीनिशी बिबट्याला लाथ मारली, असे जयसिंग यांनी सांगितले.
हे ही वाचा:
पुलवामामध्ये ३ अतिरेक्यांना कंठस्नान
दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरेंविषयी बोलू नये
जयसिंग यांच्या लाथेमुळे बिबट्याने लहानगीला सोडून दिले पण आपला मोर्चा या दाम्पत्याकडे वळवला. बिबट्याने दाम्पत्यावर हल्ला केला. शेजारी कुटुंबांची मदत मिळेपर्यंत या दाम्पत्याने बिबट्याचा सामना केला. बिबट्याच्या हल्ल्यात दाम्पत्य जखमी झाले. शेजारील कुटुंब गुर्जर दाम्पत्याकडे पोहचताच बिबट्या जंगलात पळून गेला.
आम्ही इथे खूप काळापासून राहत आहोत, पण पहिल्यांदाच बिबट्याने हल्ला केला, असे गुर्जर कुटुंबाने सांगितले. या परिसरातील सुरक्षेचा अधिक कठोर बंदोबस्त केला असून जखमींना योग्य उपचार मिळतील अशी सोयही केली आहे, असे वन विभागाचे अधिकारी पी. के. वर्मा यांनी सांगितले.