मॅग्डेबर्गमधील ख्रिसमस मार्केटमध्ये गाडी घुसून दोन ठार; सौदीच्या ५० वर्षीय डॉक्टरला अटक

दुर्घटनेत ६० हून अधिक लोक जखमी

मॅग्डेबर्गमधील ख्रिसमस मार्केटमध्ये गाडी घुसून दोन ठार; सौदीच्या ५० वर्षीय डॉक्टरला अटक

जर्मनीच्या मॅग्डेबर्ग येथील ख्रिसमस मार्केटमध्ये शुक्रवारी एका वेगवान गाडीने गर्दीमध्ये घुसून लोकांना धडक दिल्यामुळे भीषण दुर्घटना घडली आहे. यात एका लहान मुलासह दोन जण ठार झाले आहेत आणि ६० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जर्मन पोलिसांनी तालेब या सौदी अरेबियातील ५० वर्षीय डॉक्टरला अटक केली असून तो गाडी चालवत होता. विशेष म्हणजे, या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा पूर्वीच्या अहवालात करण्यात आला होता, परंतु अधिकाऱ्यांनी नंतर पुष्टी केली की आतापर्यंत दोन मृत्यू झाले आहेत.

मॅग्डेबर्गची राजधानी असलेल्या सॅक्सोनी- अनहॉल्ट राज्याचे प्रीमियर रेनर हॅसेलॉफ यांनी सांगितले की, गाडी चालवणाऱ्या सौदी अरेबियातील डॉक्टरकडे जर्मनीचे कायमस्वरूपी निवासी म्हणून ओळख होती आणि सुमारे दोन दशके ते तेथे वास्तव्य करत आहेत. डॉक्टरने वापरलेली बीएमडब्ल्यू भाड्याने घेतल्याची माहिती आहे. वाहनात कोणते स्फोटक असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता त्यानुसार तपासणी केली असता गाडीमध्ये कोणतीही स्फोटके सापडली नाहीत. अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, ही वेगवान गाडी थेट बाजारपेठेतील गर्दीत, टाऊन हॉलच्या दिशेने घुसली.

नाताळ निमित्त जर्मनमधील ही बाजारपेठ सजली होती. नाताळ सणाला आता चार दिवस उरले आहेत म्हणून जर्मनीच्या मॅग्डेबर्ग शहरात नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यावेळी ही घटना घडली. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ७ च्या नंतर बाजार खास गर्दीने भरलेला होता. त्यावेळी एक काळ्या रंगाची BMW गाडीप्रचंड वेगात या गर्दीमध्ये घुसली. पोलिसांनी सांगितलं की, आरोपीने मार्केटमध्ये ही गाडी जवळपास ४०० मीटरपर्यंत चालवली. टाऊन हॉलच्या चौकात अनेक जण प्रचंड वेगात आलेल्या या कारमुळे जखमी झाले. ही वेगवान गाडीमार्केटमध्ये घुसताच नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी लोक मिळेल त्या मार्गाने पळत होते.

हे ही वाचा  : 

हिवाळी अधिवेशनात व्यत्ययामुळे लोकसभेचे ७० तास वाया!

कल्याण मारहाण प्रकरण; अखिलेश शुक्लाने मांडली व्हिडिओतून बाजू!

संकटकाळात काय करायचं हे बोट चालकाने सांगितलं नाही!

काठमांडू ते दुबई ‘हाता’चे जाळे उद्ध्वस्त करण्याचा शंखनाद…

दरम्यान, जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. “पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत उभे आहेत. आम्ही त्यांच्या पाठीशी आणि मॅग्डेबर्गच्या लोकांच्या पाठीशी उभे आहोत. या चिंताजनक वेळेत बचाव कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानतो,” असं ते एक्सवरील पोस्टमध्ये म्हणाले. सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेचा निषेध केला आहे आणि जर्मन लोक आणि पीडितांच्या कुटुंबियांशी एकता व्यक्त केली आहे.

Exit mobile version