भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी बांग्लादेश दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. हा त्यांचा कोविडनंतरचा पहिलाच परदेश दौरा आहे. त्याबरोबरच बांग्लादेश मुक्तीच्या ५०व्या वर्षाचे औचित्य साधून दोन दिवसांचा दौरा आखण्यात आलेला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाने मोदींच्या प्रस्थानापुर्वी ट्वीट केले होते. यात “मोदींचे बांग्लादेशसाठी प्रस्थान. बांग्लादेश भेटी दरम्यान आपल्या मैत्रीपूर्ण शेजाऱ्याशी असलेले संबंध दृढ करण्यासाठी विविध कार्यक्रमांत सहभाग घेणार आहेत” असे म्हटले होते. या बांग्लादेश दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे बंग्लादेशमधील दोन मंदिरांना भेट देणार आहेत.
बांग्लादेश मधील प्रसिद्ध अशा जेशोरेश्वरी आणि ओरकांडी मंदिरांना मोदी भेट देणार आहेत. नैरुत्य शतखिरा आणि गोपालगंज अशा दोन ठिकाणी असलेल्या या मंदिरांना नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या भेटी निमित्ताने बांग्लादेश सरकारमार्फत या दोन्ही मंदिरांचा जिर्णोद्धार केला आहे.
हे ही वाचा:
भंडारा ते भांडुप…होरपळणारी जनता आणि निर्ढावलेले सरकार
पुरावे नष्ट करण्यासाठी कोणी आदेश दिले?- आशिष शेलार
फोन टॅपिंगचा रिपोर्ट जितेंद्र आव्हाड, नवाब मलिकांनीच तयार केला
ही दोन्ही मंदिरे अतिशय प्राचीन मंदिरे आहेत. सोळाव्या आणि बाराव्या शतकात भारतीय राजांनी या मंदिरांची स्थापना केल्याचे संदर्भ आढळतात. हिंदूंच्या पौराणिक मान्यतेनुसार जेशोरेश्वरी मंदिर हे एक्कावन्न शक्तिपीठांपैकी एक आहे पंतप्रधान मोदींच्या भेटीमुळे त्या क्षेत्रातील हिंदू नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मंदिर व्यवस्थापन आणि बांग्लादेश सरकार यांच्याकडून जोरदार तयारी केली जात आहे. नरेंद्र मोदींच्या भेटीमुळे या दोन मंदिरांचा जिर्णोद्धार झाल्यामुळे तिथल्या स्थानिक भाविकांकडून मोदींप्रति आभार व्यक्त केले जात आहेत.
“पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी आम्ही सगळी तयारी केली आहे. या ऐतिहासिक मंदिरात आम्ही पंतप्रधान मोदींचे स्वागत करायला उत्सुक आहोत. आम्हाला खात्री आहे की ते लाखो भारतीय आणि बांग्लादेशी लोकांसाठी प्रार्थना करतील.” अशी प्रतिक्रिया जेशोरेश्वरी काली मंदिराचे पुजारी दिलीप मुखर्जी यांनी दिली आहे.