पाकिस्तानच्या अधिकृत मीडियाने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या लष्करातील दोन हिंदू अधिकार्यांना प्रथमच लेफ्टनंट कर्नल पदावर बढती देण्यात आली आहे. मेजर डॉ. कैलाश कुमार आणि मेजर डॉ. अनिल कुमार अशी या दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत. पाकिस्तान आर्मी प्रमोशन बोर्डाने या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीला मान्यता दिल्यानंतर मेजर डॉ. कैलाश कुमार आणि मेजर डॉ. अनिल कुमार यांना लेफ्टनंट कर्नल पदावर बढती देण्यात आली आहे.
सिंध प्रांतातील थारपारकर जिल्ह्यातील रहिवासी असलेले कैलाश कुमार हे २०१९ मध्ये हिंदू समुदायातील देशातील पहिले मेजर बनले होते. त्यांचा जन्म १९८१ मध्ये झाला होता. जामशोरो येथील लियाकत युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल हेल्थ अँड सायन्सेसमधून एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर २००८ मध्ये ते पाकिस्तानी लष्करात कॅप्टन म्हणून सेवेसाठी रुजू झाले होते.
अनिल कुमार हे सिंध प्रांतातील बदीनचे रहिवासी आहेत. २००७ मध्ये ते पाकिस्तानी लष्करात सामील झाले होते. गुरुवारी सरकारी पाकिस्तान टेलिव्हिजनने कैलाश कुमारच्या प्रमोशनबद्दल ट्वीट केले. “कुमार हे लेफ्टनंट कर्नल म्हणून बढती मिळालेले पहिले हिंदू अधिकारी ठरले आहेत,” असे पीटीव्हीने ट्वीट केले आहे.
हे ही वाचा:
युक्रेन हल्ल्याचा निषेध करणाऱ्या ठरावावर भारत तटस्थ
जापनीज बँकेच्या व्हाईस प्रेसिडेंटची २७ व्या मजल्यावरून उडी
पुतीनना भेटलात, मग भोगा कर्माची फळे
दरम्यान, आतापर्यंत या दोन्ही पदोन्नतींबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायातील लोकांना २००० पर्यंत पाकिस्तानी सैन्यात सामील होण्याची परवानगी नव्हती.