जुलैच्या मध्यात आलेल्या मुसळधार पावसाने कोकणाला चांगलेच झोडपून काढले. महापुरादरम्यान कोकणात मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली.
महाड, चिपळूण भागातील औद्योगिक वसाहतींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कोकणात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याचे निर्देश दिले होते.
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या भागांची पाहणी केली. या पाहणीनुसार महाड आणि चिपळूण भागातील औद्योगिक वसाहतीतील उद्योगांचे सुमारे अडीच हजार कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्वलगन यांनी महाड व नवीन महाड औद्योगिक वसाहतीला भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला.
हे ही वाचा:
बापरे!! ठाणे पोलिस आयुक्तालयाजवळ अपघातांची ‘हद्द’ झाली
जाहिरातींबाबत गणेशोत्सव मंडळांच्या संघर्षाला अखेर आले यश
चोरीसाठी बिहारमधून त्या दाखल झाल्या मुंबईत आणि….
महाड व नवीन महाडमधील एमआयडीसी परिसरातील सुमारे दोन हजार एकरवर पसरलेल्या औद्योगिक वसाहतीला पुराचा फटका बसला. अनेक उद्योगांची दालने पाण्याखाली गेल्यामुळे मशीन, साहित्य आणि मालाचे नुकसान झाले आहे. चिपळूण मध्ये सहमुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. मलिकनेर यांनी नुकसानीचा आढावा घेतला. चिपळूण मध्ये ५० उद्योगांना महापुराचा तडाखा बसला आहे. औद्योगिक वसाहतीमधील रस्ते, पूल वाहून गेले आहेत.
महाड, चिपळूण आणि इतर भागातील नुकसानीचे पंचनामे लवकरच पूर्ण केले जातील. ज्यांनी विमा संरक्षण घेतले आहे, त्यांना कागदपात्रांची मागणी न करता भरपाई द्यावी. राज्य शासनही उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शक्य तितकी मदत केली जाईल, असे उद्योमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.