अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठीची निवडणूक पार पडली. यात डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली असून लवकरच ते राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्र हाती घेणार आहेत. या दरम्यान, ट्रम्प यांनी आपली नवीन टीम तयार करण्यास सुरुवात केली आहे. जानेवारी महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी एकामागून एक मोठ्या पदांसाठी लोकांची निवड करण्यास सुरुवात केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून रिपब्लिकन प्रतिनिधी माइक वॉल्ट्ज यांची निवड केल्याची माहिती समोर आली आहे. माइक वॉल्ट्ज यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या भूमिकेवर भारताचेही लक्ष असणार आहे. माइक वॉल्ट्ज हे यूएस आर्मीचे निवृत्त ग्रीन बेरेट (अमेरिकन सैन्याच्या स्पेशल फोर्सचे सदस्य) आहेत शिवाय चीनचे प्रमुख टीकाकार म्हणूनही त्यांना ओळखले जाते.
५० वर्षीय माइक वॉल्ट्ज हे निवृत्त आर्मी नॅशनल गार्ड अधिकारी आणि युद्धात सहभागी असलेले एक माजी जवान आहेत. त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी एक कठोर दृष्टीकोन आणण्याची अपेक्षा आहे, जी ट्रम्प यांच्या अमेरिकन सुरक्षा बळकट करण्याच्या आश्वासनांशी जवळून जुळते. माइक वॉल्ट्ज हे पूर्व- मध्य फ्लोरिडाचे तीन- टर्म रिपब्लिकन प्रतिनिधी असून यूएस हाऊसमध्ये निवडून आलेले पहिले ग्रीन बेरेट होते आणि गेल्या आठवड्यात त्यांची पुन्हा निवड झाली. ते सशस्त्र सेवा उपसमितीचे अध्यक्ष आणि हाऊस फॉरेन अफेअर्स कमिटी आणि इंटेलिजन्सवरील स्थायी निवड समितीचे सदस्य देखील आहेत.
माइक वॉल्ट्ज हे कठोर संरक्षण रणनीतींचे कट्टर समर्थक आहेत. ते एक अनुभवी परराष्ट्र धोरण तज्ञ असून यूएस- भारत युतीचे उत्कट समर्थक आहे. त्यांनी भारतासोबत विशेषतः संरक्षण आणि सुरक्षा सहकार्यामध्ये मजबूत संबंध वाढवले आहेत. उल्लेखनीय म्हणजे, त्यांनी २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यावेळी नरेंद्र मोदी यांच्या कॅपिटल हिल येथे भाषणाची व्यवस्था करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
हे ही वाचा:
बांगलादेशी मुलींना हिंदू नावाने आधारकार्ड, ईडीची झारखंड, प. बंगालमध्ये छापे
नवी मुंबईमधील रो-हाऊसमधून पोलिसांच्या हाती लागले अडीच कोटींचे घबाड
उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय, राहिलाय तो खान
राहुल गांधी चुxया बनवतोय ! फेक नरेटीव्हचा ‘प्रकाश आंबेडकरी’ अनुवाद…
माइक वॉल्ट्ज यांनी वेळोवेळी चीन विरोधात भूमिका घेतलेली आहे. कोविड-१९ च्या उत्पत्तीमध्ये चीनचा सहभाग असल्यामुळे आणि उइघुर मुस्लिमांवरील कथित गैरवर्तनामुळे माइक वॉल्ट्ज यांनी चीनवर चौफेर टीका केली होती. शिवाय बीजिंगमधील २०२२ हिवाळी ऑलिम्पिकवर अमेरिकेने बहिष्कार टाकण्याची मागणी देखील केली होती. माइक वॉल्ट्ज यांनी जो बायडन यांच्या प्रशासनाच्या अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेण्याच्या निर्णयावर जबरदस्त टीका केली होती. दरम्यान, माइक वॉल्ट्ज यांची नियुक्ती ही अमेरिकेचे संबंध भारतासोबत आणखी मजबूत भागीदारीकडे नेणारी ठरू शकते.