अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात व्हाईट हाऊसमध्ये चर्चा झाली. या भेटीदरम्यान एक महत्त्वाचा खनिज करार होईल आणि रशियाच्या आक्रमणाचा अंत करण्यासाठी अमेरिकेचा पाठिंबा वाढेल अशी आशा जगाला या भेटीमधून होती. मात्र, या भेटीत वेगळेच चित्र पाहायला मिळाले. दोन्ही नेत्यांमधील बैठकीची सुरुवात औपचारिक बैठकीने झाली. पुढे ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात झालेल्या अनौपचारिक संभाषणाचे रूपांतर लवकरच जोरदार वादविवादात झाले. जेव्हा ट्रम्प आणि झेलेन्स्की व्हाईट हाऊसमध्ये भेटले, तेव्हा अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स देखील उपस्थित होते.
शुक्रवारी जेव्हा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी आले तेव्हा ते युद्ध संपवण्याच्या दिशेने वाटचाल करतील अशी अपेक्षा होती, परंतु येथे उलट घडले. कॅमेऱ्यासमोरचं या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. ट्रम्प यांनी सांगितले की, ते युक्रेन आणि रशियाशी चर्चेत सहभागी आहेत कारण त्यांना जीव वाचवायचे आहेत आणि शांतता प्रस्थापित करणारा म्हणून त्यांची आठवण ठेवली जाण्याची अपेक्षा आहे.
एका प्रश्नाचे उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, “मला आशा आहे की मला शांतता प्रस्थापित करणारा म्हणून लक्षात ठेवले जाईल. जर आपण रशिया- युक्रेन युद्धाचा तोडगा काढू शकलो तर ही एक उत्तम गोष्ट असेल. मी हे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जीव वाचवण्यासाठी करत आहे. दुसरे म्हणजे खूप पैसे वाचवणे, परंतु मी ते खूपच कमी महत्त्वाचे मानतो.” पुढे ते म्हणाले की, ही एक अतिशय धोकादायक परिस्थिती आहे. तुम्हाला माहिती आहे की यामुळे तिसरे महायुद्ध होऊ शकते. हे चुकीच्या दिशेने जात होते. ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना सांगितलं की, ते तिसरे महायुद्ध खेळत आहेत.
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी झेलेन्स्की यांच्यावर अनादर करणारा आणि अमेरिकन माध्यमांसमोर खटला चालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. झेलेन्स्की यांनी प्रत्युत्तर देत विचारले की, युक्रेनला भेट न देता व्हान्सला युक्रेनच्या समस्या कशा कळतील. युक्रेनच्या अध्यक्षांनी सांगितले की युद्धादरम्यान प्रत्येकाला समस्या येतात आणि अमेरिकेलाही भविष्यात त्या जाणवतील. यावरून ट्रम्प यांनी टीका करत म्हटले की, आम्हाला काय वाटणार आहे ते आम्हाला सांगू नका. आम्ही एक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही ते हुकूम देण्याच्या स्थितीत नाही आहात. तुम्ही स्वतःला खूप वाईट स्थितीत राहू दिले आहे. तुमच्याकडे सध्या पत्ते नाहीत, आमच्याकडे पत्ते आहेत. तुम्ही लाखो लोकांच्या जीवनाशी जुगार खेळत आहात. तुम्ही तिसऱ्या महायुद्धाशी जुगार खेळत आहात आणि तुम्ही जे करत आहात ते या देशाचा खूप अपमान करणारे आहे.
यावर झेलेन्स्की यांनी उत्तर दिले की, “आम्ही आमच्या देशात राहतोय, युद्धाच्या सुरुवातीपासूनच मजबूत राहतोय आणि आम्ही अमेरिकेचे आभारी आहोत.” यानंतर ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यावर टीकास्त्र डागले. ट्रम्प म्हणाले की, आम्ही तुम्हाला ३५० अब्ज डॉलर्स दिले. लष्करी उपकरणे दिली. जर तुमच्याकडे आमची लष्करी उपकरणे नसती तर हे युद्ध दोन आठवड्यात संपले असते. तुमचा देश मोठ्या संकटात आहे.
हे ही वाचा :
पत्नीच्या जाचाला कंटाळून आग्रा येथील तंत्रज्ञाची आत्महत्या; मृत्युपूर्वी बनवला व्हिडीओ
सरकारी योजनांच्या निधीसाठी काँग्रेसशासित सुखू सरकारने मंदिरांपुढे पसरले हात
कंगना राणौत आणि जावेद अख्तर यांनी ५ वर्षांपासूनचा वाद अखेर मिटविला!
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांची मोदी, बागेश्वर बाबांवर स्तुतीसुमने
बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर झेलेन्स्की यांच्यावर टीका केली. झेलेन्स्की शांततेसाठी तयार नसल्याचे ते म्हणाले. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, “आज व्हाईट हाऊसमध्ये आमची खूप उत्पादक बैठक झाली. अशा आग आणि दबावाच्या संभाषणाशिवाय कधीच समजले नसते असे बरेच काही शिकलो. भावनांमधून जे बाहेर येते ते आश्चर्यकारक आहे. मी ठरवले आहे की जर अमेरिका सहभागी असेल तर राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की शांततेसाठी तयार नाहीत कारण त्यांना वाटते की आमचा सहभाग त्यांना वाटाघाटींमध्ये मोठा फायदा देतो. मला फायदा नको आहे, मला शांतता हवी आहे. त्यांनी प्रतिष्ठित ओव्हल ऑफिसमध्ये अमेरिकेचा अनादर केला. जेव्हा ते शांततेसाठी तयार असतील तेव्हा ते परत येऊ शकतात.”