पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यानंतर दोन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये अमेरिका आणि भारत यांच्यामधील संबंध अधिक दृढ करण्यावरून चर्चा झाली. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक खास भेट दिली. यावर त्यांनी लिहिलेला संदेश सगळ्यांचेचं लक्ष वेधून घेत आहे.
गुरुवारी नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात व्यापार, सुरक्षा आणि द्विपक्षीय संबंध यावर सखोल चर्चा झाल्यानंतर ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ‘अवर जर्नी टुगेदर’ या पुस्तकाची स्वाक्षरी केलेली खास प्रत भेट म्हणून दिली. ओव्हल ऑफिसमध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत करताना, ट्रम्प यांनी त्यांना मिठी मारली आणि नंतर ते चर्चेसाठी बसले. संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान, ट्रम्प यांनी वैयक्तिकरित्या पंतप्रधान मोदी यांच्यासाठीच्या पुस्तकावर स्वाक्षरी केली आणि लिहिले की, “श्रीमान पंतप्रधान, तुम्ही महान आहात.” तसेच त्यांनी पुस्तकाची काही पाने पलटून त्यातील भारत भेटीसंबंधीचे आणि नरेंद्र मोदींच्या भेटीचे फोटोही खास दाखवले. “भारताचे पंतप्रधान मोदी असणे हा एक मोठा सन्मान आहे. ते माझे खूप काळापासूनचे चांगले मित्र आहेत. आमचे एक अद्भुत नाते आहे आणि आम्ही आमच्या ४ वर्षांच्या काळात हे नाते टिकवून ठेवले आहे,” असे ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले.
‘अवर जर्नी टुगेदर’ हे एक कॉफी टेबल बुक असून हे ३२० पानांचे पुस्तक आहे. या पुस्तकात ट्रम्प यांच्या पहिल्या टर्मच्या काळातील संस्मरणीय क्षण दाखवले आहेत. त्यात किम जोंग-उन, शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतिन यांसारख्या जागतिक नेत्यांसोबतच्या बैठकांचाही उल्लेख आहे. शिवाय या पुस्तकात २०२० मध्ये त्यांनी भारतात आल्यावर ताजमहालला भेट दिली तेव्हाचे छायाचित्रही लावण्यात आले आहे. तर, ‘हाउडी मोदी’ आणि ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमांची झलक आहे.
हे ही वाचा :
बांगलादेशात शोलोहाटी दुर्गा मंदिरावर कट्टरवाद्यांचा हल्ला, मूर्तींची केली तोडफोड!
राजस्थानच्या धोलपूरमध्ये तीन गो तस्करांना अटक, २६ गायींची सुटका!
मुस्लीम नर्स म्हणाली, ‘आम्ही अनेक इस्रायली रुग्णांना मारले, नरकात पाठवले’
“मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा निर्णय देण्यापूर्वी बदलीची टांगती तलवार डोक्यावर होती”
२०१९ मध्ये ह्युस्टन फुटबॉल स्टेडियममध्ये ‘हाउडी मोदी’ रॅली आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये ५० हजारांहून अधिक भारतीय-अमेरिकन लोकांनी भाग घेतला होता. यावेळी, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प दोघांनीही भाषणे दिली होती. तर, फेब्रुवारी २०२० मध्ये अहमदाबादमधील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामुळे भारत- अमेरिका संबंधांना नवीन बळकटी मिळाली होती.