एकूण २६ पदक भारताच्या पदरी
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्सच्या आठव्या दिवशी भारताने अनेक पदकांची कमाई केली आहे. कुस्तीपटू साक्षी मलिक आणि दीपक पुनिया यांनी सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच अंशू मलिकने रौप्य तर दिव्या काकरानने कांस्यपदक पटकावले आहे.
भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने राष्ट्रकुल स्पर्धेत प्रथमच सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. साक्षीने ६२ किलो गटात फ्रीस्टाइलच्या अंतिम सामन्यात कॅनडाच्या ऍना गोडिनेझ गोन्झालेझचा पराभव केला. साक्षीने यापूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेत २०१४ साली रौप्य आणि २०१८ साली कांस्यपदक जिंकले होते.
तसेच दीपक पुनियाने पुरुषांच्या ८६ किलो गटात फ्रीस्टाइलमध्ये पाकिस्तानच्या मोहम्मद इनामचा ३-० असा पराभव करून भारताचे नववे सुवर्णपदक जिंकले. त्यानेसुद्धा राष्ट्रकुल स्पर्धेत पहिले सुवर्णपदक कमावले आहे. दीपकने सुरुवातीला आपल्या चपळाईचा चांगला उपयोग करून पहिल्या फेरीपर्यंत २-० अशी आघाडी घेतली.पाकिस्तानी कुस्तीपटूला त्याने एकही गुण घेण्याची संधी दिली नाही. मात्र, दुसऱ्या फेरीत दोन्ही कुस्तीपटू एकमेकांना चुरशीची स्पर्धा देताना दिसले. दीपकने सुरुवातीच्या मिनिटाला एक गुण मिळवत हा शानदार सामना ३-० असा जिंकला. तर ६५ किलो वजनी गटात फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये बजरंग पुनियाने सुवर्णपदक जिंकले आहे.
हे ही वाचा:
वझीरएक्स क्रिप्टो एक्सचेंजची ६४ कोटींची बँक मालमत्ता ईडीने गोठवली
केसरकर म्हणतात, तेव्हा उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते
मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर
भारताची राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकांची संख्या २६ वर पोहोचली. ज्यामध्ये नऊ सुवर्णपदक, आठ रौप्यपदक आणि नऊ कांस्यपदक आहेत.मीराबाई चानू, जेरेमी लालरिगुंना, अंचिता शेऊली, महिला लॉन बॉल्स संघ, टेबल टेनिस पुरूष संघ, सुधीर (पॅरा वेटलिफ्टिंग), साक्षी मलिक, बजरंग पुनिया, दीपक पुनिया यांनी सुर्वपदक पटकावले आहे. तर संकेत सरगर, बिंदियाराणी देवी, सुशिला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंजू मलिक यांनी रौप्यपदक पटकावले आहे. याशिवाय गुरूराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, सौरभ घोषाल, गुरदीप सिंग, तेजस्विन शंकर, दिव्या काकरान, मोहित ग्रेवाल यांनी कांस्यपदक जिंकले आहे. अशी एकूण २६ पदक भारताच्या मिळवली असून, यामुळे भारतीय संघ सध्या पदकतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे.