मुंबईत घडणार ट्रामचे दर्शन

मुंबईत घडणार ट्रामचे दर्शन

मुंबई महानगर पालिकेने बेस्ट कडून ताब्यात घेतलेल्या ट्रामचे उद्घाटन अखेरीस मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल समोरील भाटीया बाग या ठिकाणी बेस्टच्या ट्रामचा एक डबा, महानगरपालिकेने स्थापन केला होता त्याचे उद्घाटन करण्यात आले.

हे ही वाचा:

सावरकरांचा महानायक: चंद्रगुप्त मौर्य

एकेकाळी मुंबईच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या ट्रामचा एक डबा महानगरपालिकेने बेस्टकडून ताब्यात घेतला होता. त्यानंतर त्याला सुशोभित करून छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल समोरील भाटिया बाग या ठिकाणी एका चौथऱ्यावर प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. मात्र त्यानंतर कोविड-१९च्या महामारीमुळे टाळेबंदी लागू करावी लागली. त्यामुळे मुंबईच्या सामान्य नागरिकांना या डब्याचे दर्शन घडू शकले नव्हते.

या ट्रामचे उद्घाटन करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की मुंबई महानगरपालिकेने बेस्टकडून घेऊन भाटिया बागेत स्थापन केला आहे, ज्यामुळे सामान्य नागरिकाला आपल्या उज्वल इतिहासाला उजाळा देता येईल. पिवळ्या आणि तपकिरी रंगातील या दुमजली ट्रामला आतून दिव्यांनी सुशोभित करण्यात आले आहे, ज्यामुळे पर्यटकांना रात्री देखील या ट्रामच्या दर्शनाचा आनंद घेता येईल.

एकेकाळी ट्राम ही मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अविभाज्य भाग होती. सुमारे ९० वर्षे अतिशय स्वस्त आणि सुलभ अशा सेवेमुळे ट्राम मुंबईकरांची लाडकी राहिली होती. १९६४ मध्ये ट्राम पूर्णपणे बंद करण्यात आली होती.

Exit mobile version