आयसीसी मेन्स टी-२० स्पर्धेच्या ‘सुपर १२’ फेरीला सुरुवात झाली आहे. आज म्हणजेच रविवार २४ ऑक्टोबर रोजी या फेरीतील सर्वात धमाकेदार असा सामना जगभरातील क्रिकेट रसिकांना पाहता येणार आहे. तो सामना म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्तान. त्यामुळे यावेळी नेमका कोणाला ‘मौका’ मिळणार याची चर्चा जगभर रंगलेली पाहायला मिळत आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघ हा बाबर आजमच्या पाकिस्तान संघाला भिडणार आहे. या दोन्ही संघांची तुलना करता भारताचा संघ हा पाकिस्तान पेक्षा जास्त मजबूत आणि सुस्थितीत दिसत आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारताला एक नैसर्गिक फायदा असल्याचे म्हटले जात आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाची फलंदाजी ही खूप चांगल्या प्रकारे असल्याचे क्रिकेटमधील तज्ञांचे म्हणणे आहे. ज्यामध्ये बाबर आजम, मोहम्मद रिजवान, फकर झमान या युवा फलंदाजांच्या सोबतच मोहम्मद हफिज आणि शोएब मलिक यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. पण त्या तुलनेत पाकिस्तानची गोलंदाजी कमकुवत असल्याचे म्हटले जात आहे.
हे ही वाचा:
पाकिस्तानमध्ये का सुरु आहेत दंगली?
इस्लामचा त्याग करून इंडोनेशियाच्या राजपुत्री करणार हिंदुधर्मात प्रवेश! वाचा सविस्तर…
मुस्लिम समाजातील काही लोक का टाळत आहेत लसीकरण?
३४ मतदारांच्या निवडणुकीत शरद पवार-धनंजय शिंदे लढत
दुसरीकडे भारतीय क्रिकेट संघ प्रत्येक बाबतीतच पाकिस्तानपेक्षा उजवा ठरू शकतो. भारताकडे कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, के.एल. राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत यांच्यासारख्या धडाकेबाज फलंदाजांची मोठी फळी आहे. तर त्या सोबतच हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा यांच्यासारखे अष्टपैलू खेळाडूही भारताच्या चमूमध्ये आहेत. गोलंदाजीच्या बाबतीतही भारताकडे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, वरूण चक्रवर्ती यांच्यासारखे टी-२० क्रिकेट मधले एक्सपर्ट मानले जाणारे गोलंदाज आहेत. त्यामुळे कागदावर तरी भारतीय संघ हा पाकिस्तानपेक्षा जास्त बलवान दिसत आहे. त्यात नुकत्याच दुबईत पार पडलेल्या आयपीएलमुळे भारतीय संघातील खेळाडूंना इथल्या वातावरणात खेळण्याची चांगली सवय आहे. ही देखील भारतासाठी जमेची बाब ठरणार आहे.
त्यामुळे आजचा हा धुवादार सामना नेमके कोण जिंकणार हे काही तासांतच स्पष्ट होणार आहे. आजवर पाकिस्तानी संघाने कोणत्याही विश्वचषकात भारताचा पराभव केलेला नाही. आजवर टी-२० विश्वचषकातही पाच वेळा हे दोन्ही संघ आमने सामने आले असून प्रत्येक वेळीच भारताने पाकिस्तानला मात दिली आहे. त्यामुळे हा इतिहास आज बदलणार की तसाच कायम राहणार हे आज संध्याकाळी ठरणार आहे. ७.३० वाजता या हाय व्होल्टेज नाट्याला सुरुवात होणार आहे. स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.