जुलै महिन्यात जपानची राजधानी टोकियो येथे होणारे ऑलिम्पिक खेळ रद्द करावेत अशी मागणी स्थानिक डॉक्टरांकडून करण्यात आली आहे. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात यावा असे टोकियोमधील डॉक्टरांच्या प्रमुख संस्थेने जपानच्या पंतप्रधानांना कळविले आहे. कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील आरोग्य व्यवस्थेवर ताण आला असून अशात ऑलिम्पिक खेळवून कोविड रुग्णसंख्या वाढू शकते आणि त्यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध नसल्याचे या डॉक्टरांचे म्हणणे आहे.
जगभर सध्या कोविडचा हाहाकार सुरु असून त्याचा परिणाम सर्व क्षेत्रांवर होताना दिसत आहे. क्रीडा क्षेत्रही याला अपवाद नसून कोविडच्या सावटामुळे ऑलिम्पिक ही जागतिक दर्जाची क्रीडास्पर्धा रद्द करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. अवघ्या दोन महिन्यांवर ऑलिम्पिक स्पर्धा येऊन ठेपली आहे. जपानची राजधानी टोकियो हे या स्पर्धेचे यजमान शहर असणार आहे. पण कोविडचे संकट पाहता ही स्पर्धा खेळवण्यात येऊ नये असे टोकियोच्या स्थानिक डॉक्तरांच्या संस्थेने म्हटले आहे. यासंबंधी त्यांनी जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना पत्र लिहीले आहे.
हे ही वाचा:
कोरोनाविषयी जागृती निर्माण करणारे, पद्मश्री डॉ. के. के. अगरवाल यांचे निधन
स्पुतनिक-व्ही लस मुंबईत कधी? कुठे? किंमत काय?
‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे?
नौदलाने वाचवले १४६ मच्छिमारांना
टोकियो मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन या संस्थेने ऑलिम्पिक रद्द करावे अशी मागणी केली आहे. या संस्थेशी टोकियोमधील ६००० डॉक्टर्स संलग्न आहेत. या संस्थेच्या म्हणण्यानुसार कोविडमुळे शहरातील हॉस्पिटल्स ही रुग्णांनी भरून गेली आहेत. शहरातील रुग्णालयांची क्षमता संपली आहे. अशा परिस्थितीत आयओसी अर्थात इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीला विनंती करून ही स्पर्धा तात्पुरती रद्द करण्यात यावी असे या संस्थेचे म्हणणे आहे. जपानच्या पंतप्रधानांना खुले पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे.
२३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत जपानमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा खेळवली जाणार आहे. जपान कोविडची सर्व खबरदारी घेऊन ही स्पर्धा खेळवू शकतो असा विश्वास जपानचे पंतप्रधान सुगावा यांनी याआधीच व्यक्त केला आहे. पण तरीही आता डॉक्टरांच्या संस्थेनेच स्पर्धा पुढे ढकलण्याची मागणी केल्यामुळे ऑलिम्पिकच्या भवितव्याविषयी प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. याआधीही एकदा ऑलिम्पिक स्पर्धा कोविडमुळे पुढे ढकलली गेली होती.