सध्या कतारमध्ये निर्वासित जीवन जगत असलेले हमासचे नेते इस्माइल हनियेहचे तीन मुलगे गाझा पट्टीमध्ये इस्रायल संरक्षण दलाने (आयडीएफ) केलेल्या ताज्या हवाई हल्ल्यात ठार झाले. ‘हनीयेहचे तीन मुलगे – अमीर, हाझेम आणि मोहम्मद – मध्य गाझा परिसरात दहशतवादी कारवाया करण्यासाठी जात असताना इस्रायल संरक्षण दलाने त्यांच्यावर हल्ला केला,’ अशी माहिती इस्रायल संरक्षण दलाने ‘एक्स’वर दिली.
अल जझीरा उपग्रह वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इस्माईल हनीयेह यांनीही त्यांच्या चार मुलांपैकी तीन मुले जेरुसलेम आणि अल-अक्सा मशीद मुक्त करताना शहीद झाले, असे सांगितले. तसेच, ‘गुन्हेगारी शत्रू सूडाच्या भावनेने प्रेरित आहे आणि हत्या तसेच, कोणत्याही नियमांना किंवा कायद्याला तो महत्त्व देत नाही,’ असेही त्याने फोनवरील मुलाखतीत सांगितले.
‘नेत्यांच्या कुटुंबियांना लक्ष्य करून ते आमच्या लोकांच्या मागण्या सोडण्यास प्रवृत्त करतील, असा शत्रूचा विश्वास आहे. माझ्या मुलांना लक्ष्य केल्याने हमासला आपली स्थिती बदलण्यास भाग पाडले जाईल, असे जर कोणाला वाटत असेल, तर तो केवळ भ्रम आहे,’ असेही हमासच्या या नेत्याने स्पष्ट केले. इस्माईल हनीयेह कतारमध्ये निर्वासित राहतात.
गाझा शहरातील शाती शरणार्थी शिबिराजवळ इस्रायलचा हा हवाई हल्ला झाला. हानियेह हे मूळचे या भागातीलच आहेत. इस्रायल संरक्षण दलाच्या म्हणण्यानुसार, अमीर हनीयेह हे हमासच्या लष्करी शाखेत एक पथक कमांडर होते, तर हाझेम आणि मोहम्मद हनीयेह हे खालच्या दर्जाचे अधिकारी होते.
हे ही वाचा:
शुभमन गिल, राशिद खान यांनी साकारला गुजरातचा विजय
ओवेसिंच्या विरोधात कॉंग्रेस उमेदवार देणार नाही
परगाणा भागात इस्लामवाद्यांचा हिंदुंवर हल्ला
हमासच्या अल-अक्सा टीव्ही स्टेशनने केलेल्या दाव्यानुसार, एकाच वाहनातून हे भाऊ कुटुंबीयांसह प्रवास करत असताना इस्त्रायली ड्रोनने त्यांच्यावर हल्ला झाला. त्यात एकूण सहा जण ठार झाले. यात हाझेम हनीयेहची मुलगी आणि आमिरचा मुलगा आणि मुलगी यांचा समावेश आहे.