अमेरिकीच्या अध्यक्षपदाच्या सन २०२४मधील निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षात वादविवादाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आठ उमेदवार चर्चेत होते. त्यामध्ये दोन भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांचा सहभाग होता. या निवडणुकीत तीन उमेदवार हे भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक आहेत, जे ट्रम्प यांना आव्हान देतील. यामध्ये विवेक रामास्वामी, निकी हेली आणि हर्षवर्धन सिंह यांचा समावेश आहे. अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक ५ नोव्हेंबर, २०२४ रोजी होईल. मात्र तत्पूर्वी रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदासाठी उमेदवार ठरवण्याची प्रक्रिया जानेवारीपासून सुरू होईल. डोनाल्ड ट्रम्प हे आघाडीचे उमेदवार असूनही त्यांना कडवी स्पर्धा द्यावी लागणार आहे.
अमेरिकी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सन २०२४मधील अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पहिल्या वादविवादात सहभागी झाले नव्हते. त्यांचे आठ प्रतिस्पर्धी एकमेकांना लढत देत आहेत. अमेरिकी अध्यक्षपद निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या इतिहासात पहिल्यांदाच प्राथमिक वादविवादामध्ये भारतीय वंशाचे दोन अमेरिकी नागरिक एकाच व्यासपीठावर दिसले.
निकी हेली आणि विवेक रामास्वामी यांच्यात वादविवाद झाला. त्यांच्यात पहिल्या टप्प्यात परराष्ट्र व्यवहार धोरणाबत चर्चा झाली. साऊथ कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर हेली यांनी प्रतिस्पर्धी आणि उद्योगपती रामास्वामी यांच्यावर परराष्ट्र धोरणाबाबत कमी अनुभव असल्याचा तसेच, रशियाचे समर्थन केल्याचा आरोप केला. हेली (५१) आणि रामास्वामी (३८) गेल्या काही दिवसांपासून परराष्ट्र धोरणाच्या मुद्द्यांवर सोशल मीडियावर स्वत:ची बाजू मांडत आहेत.
सर्वेक्षणानुसार, विवेक रामास्वामी डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागे आहेत. मात्र त्यांच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. त्यांना माजी अध्यक्ष ट्रम्प यांचे समर्थनही मिळाले आहे. मात्र त्यांचा क्रमांक निकी हेली आणि अन्य रिपब्लिक उमेदवारांच्या बराच मागे आहे.
हे ही वाचा:
मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल बांधील
सुशांत सिंग राजपूत अहंकारी नव्हता, पण या कारणासाठी त्याने अनेक चित्रपटांना दिला नकार
हिमाचल प्रदेशात भूस्खलन; ५४ घरे खचल्याची भीती
ज्येष्ठ गीतकार देव कोहली यांचे निधन
१. विवेक रामास्वामी – ३६० दशलक्ष अमेरिकी डॉलर संपत्तीचे मालक असणारे भारतीय वंशाचे अमेरिकी उद्योगपती विवेक रामास्वामी यांचे कुटुंब केरळमधून अमेरिकेत गेले होते. ३८ वर्षीय विवेक यांना माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांचा पाठिंबा आहे. ते अमेरिकेत येणाऱ्या स्थलांतरितांच्या विरोधात आहेत.
२. निकी हेली – हेली यांचा जन्म दक्षिण कॅरोलिनामधील एका शीख कुटुंबात झाला. त्यांनी लग्नानंतर ख्रिस्ती धर्म स्वीकारला. त्या दोन वेळा दक्षिण कॅरोलिनाच्या गव्हर्नर राहिल्या आहेत. त्यांनी ट्रम्प सरकारमध्ये संयुक्त राष्ट्राच्या राजदूत म्हणूनही काम पाहिले आहे.
३. हर्षवर्धन सिंह – हर्षवर्धन सिंह हे एक कट्टर लसविरोधी उमेदवार आहेत. ते स्वत:ला ‘शुद्ध रक्त रिपब्लिकन’ असल्याचे सांगतात. ३८ वर्षीय हर्षवर्धन सिंह यांचा जन्म न्यूजर्सीमध्ये भारतीय वंशाच्या मातापित्यांच्या पोटी झाला होता. ते व्यवसायाने विमान इंजिनीअर आहेत.