खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येप्रकरणी कॅनडा पोलिसांनी तिघा भारतीयांना अटक केली आहे. निज्जर याची हत्या करण्यासाठी भारत सरकारने नियुक्त केलेल्या पथकात त्यांचा समावेश होता, असा आरोप पोलिसांनी केला आहे. तर, हे सर्व जण बिश्नोई गँगचे असल्याचे म्हटले जात आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात निज्जर याच्या झालेल्या हत्येत भारतीय एजंटांचा कथित सहभाग असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. त्यानंतर भारत आणि कॅनडाचे संबंध ताणले गेले होते. भारताने हे आरोप फेटाळले होते. मात्र आता कॅनडा पोलिसांनी तीन भारतीयांना अटक केली आहे. हत्या प्रकरणाच्या तपासासह भारत सरकारच्या संभाव्य संबंधाचाही तपास केला जात आहे, असे कॅनडा पोलिसांतर्फे सांगण्यात आले आहे.
कॅनडा पोलिसांनी निज्जर हत्येप्रकरणी करण बराड, करणप्रीत सिंग, कमलप्रीत सिंग यांना अटक केली असून सर्वांची वये २०च्या आसपास आहेत. हे तिन्ही भारतीय नागरिक असून ते गेल्या तीन ते पाच वर्षांपासून कॅनडात तात्पुरते वास्तव्य करत आहेत. हे सर्व आरोपी तात्पुरत्या व्हिसावर सन २०२१ मध्ये कॅनडात पोहोचले होते. त्यातील काहींजवळ स्टुडंट व्हिसा होता. मात्र कोणीच कॅनडात शिक्षण घेतले नाही. त्यांचा संबंध हरियाणा आणि पंजाबमधील गुन्हेगारांशी तसेच, कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईशी असल्याचे सांगितले जाते. कॅनडा पोलिसांनी खलिस्तानी दहशतवादी सुखदूल उर्फ सुख्खा दुनुके याच्या हत्येतही लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचा दावा केला होता.
हे ही वाचा:
‘रोहित वेमुला दलित नाही’; पोलिसांनी केली मृत्यूच्या तपासाची फाइल बंद
अमित शहा एडिटेड व्हिडीओ प्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई, काँग्रेस नेत्याला अटक!
पंतप्रधानांचं ठरलं, १३ मे रोजी वाराणसीमध्ये रोड शो, या दिवशी भरणार उमेदवारी अर्ज!
पवारांनी मुंडेंची लायकी काढली, स्वत:ची दाखवली…
भारत सरकारशी समन्वय गेल्या काही वर्षांपासून कठीण आणि आव्हानात्मक राहिल्याचे कॅनडाचे तपासप्रमुख मंदीप मुकर यांनी सांगितले. त्यामुळे हा तपास शीख समुदायाच्या समर्थनावर अवलंबून आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.