कॅनडातील तीन हिंदू मंदिरांमध्ये तोडफोड आणि चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. कॅनडातील ओंटारियो प्रांताच्या डरहम क्षेत्राचे पोलिस एका संशयिताचा शोध घेत आहेत. त्याने तीन हिंदू मंदिरांमध्ये तोडफोड करून रोख रकमेची चोरी केल्याचा संशय व्यक्त होत आहे. हा आरोपी रविवारी पिकरिंगमध्ये बेली स्ट्रीट आणि क्रोस्नो बुलेवॉर्ड भागातील एका मंदिरातही घुसला होता.
डरहम पोलिस विभागाने आरोपीचे वर्णन जाहीर केले आहे. या संशयिताने निळ्या रंगाचा सर्जिकल मास्क, हुडचे काळ्या रंगाचे पूफी जॅकेट, हिरव्या रंगाची कार्गो पँट आणि हिरव्या रंगाचे स्पोर्ट्स शूज घातले होते, असे पोलिसांनी सांगितले. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याने त्याला कैद केले आहे.
सीसीटीव्ही फुटेजनुसार, आरोपी रविवारी रात्री सुमारे पाऊण वाजता मंदिरात घुसला होता आणि त्याने दानपेटीतून रोख रक्कम चोरली होती. मात्र पोलिस पोहोचण्याआधीच आरोपीने घटनास्थळावरून पलायन केले. त्यानंतर रात्री सुमारे दीड वाजता वेस्ट डिव्हिजनच्या सदस्यांनी पिकरिंगमधील ब्रॉक रोड आणि डर्सन स्ट्रीट भागात एका मंदिरात घुसखोरी आणि चोरी झाल्याची माहिती पोलिसांना कळवली.
आरोपीने मंदिराची खिडकी तोडून दानपेटी चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो दानपेटी चोरू शकला नाही. या मंदिरांमध्ये चोरी आणि चोरीचा प्रयत्न केल्यानंतर हा चोर रात्री सुमारे अडीच वाजता अजाक्समधील वेस्टनी रोड साऊथ आणि बेली स्ट्रीट वेस्ट भागातील एका मंदिरात घुसला आणि दानपेटीमधील सर्व रोख रक्कम चोरून फरार झाला.
हे ही वाचा:
सिनेमाचे पोस्टर टाईम्स स्क्वेअरवर झळकणारा ‘शिवरायांचा छावा’ पहिला मराठी सिनेमा
इतिहास घडणार; छत्तीसगडमध्ये ‘बुलेट’वर ‘बॅलेट’चे यश
इस्लामिक दहशतवादाचा फ्रान्सवर विपरित परिणाम
ऑपरेशन अजय: २३५ प्रवाशांना घेऊन दुसरे विमान भारतात दाखल
चोराची माहिती देणाऱ्याला बक्षीस
मंदिरात चोरी करणाऱ्या चोराची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या चोराची माहिती देणाऱ्याला दोन हजार कॅनडियन डॉलर दिले जातील, असे पोलिसांनी जाहीर केले आहे.