निदर्शनादरम्यान पोलिसांची हत्या करणाऱ्या तिघांना इराणमध्ये फाशी

निदर्शनादरम्यान पोलिसांची हत्या करणाऱ्या तिघांना इराणमध्ये फाशी

सरकारविरोधी निदर्शनांदरम्यान हिंसाचार केल्याबद्दल इराणने शुक्रवारी तिघांना फाशीची शिक्षा दिली. माजिद काझेमी, सालेह मिरहाशेमी आणि सईद याघौबी यांना इस्फहानच्या मध्यवर्ती शहरात फाशी देण्यात आली. १६ नोव्हेंबर रोजी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेत या तिघांनी निमलष्करी दलाचे दोन अधिकारी आणि एका पोलिस अधिकाऱ्याची हत्या केली होती.

या घटनेचा अनेक देशांनी निषेध केला आहे. हा खटला सदोष पद्धतीने चालवण्यात आला आणि आरोपींचा छळ करून त्यांच्याकडून कबुलीजबाब घेण्यात आला, असा आरोप अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने केला आहे. मात्र अत्याचार करून हे कबुलीजबाब घेण्यात आले असल्याच्या वृत्ताचा इराणने इन्कार केला आहे.

गेल्या वर्षी इराण सरकाविरोधात देशव्यापी निदर्शने सुरू झाल्यापासून शुक्रवारी फाशी देण्यात आलेल्या निदर्शकांची संख्या किमान सात झाली. इराणच्या नैतिकता पोलिसांच्या ताब्यात असताना २२ वर्षीय इराणी कुर्दिश महिला महसा अमिनी हिचा १६ सप्टेंबर रोजी मृत्यू झाल्यामुळे येथे आंदोलन पेटले होते. तिने इराणी सरकारच्या वेषभूषा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप तिच्यावर होता.

हे ही वाचा:

केजरीवाल यांच्या आनंदावर केंद्र सरकारने फिरवला बोळा

दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची काय आहेत कारणे?

अदानी उद्योग समूहाला सर्वोच्च न्यायालयाच्या समितीची क्लीन चिट !

समीर वानखेडे यांना हायकोर्टाकडून दिलासा !

ज्या तिघांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली, त्यांनी बुधवारी लोकांचा पाठिंबा मिळावा, यासाठी एक स्वलिखित चिठ्ठी लिहिली होती. त्यात त्यांनी ‘त्यांना आम्हाला मारू देऊ नका, आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे,’ असे आवाहन केले होते.

ही चिठ्ठी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. अमेरिकेनेही त्यांची फाशीची शिक्षा थांबवा, असे आवाहन केले होते. या तिघांच्या समर्थनार्थ तुरुंगाबाहेर त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांनी रात्रभर गर्दी केली होती. फाशीची घोषणा झाल्यानंतर राजधानी तेहरान आणि इतर काही शहरांमध्ये रस्त्यावर निदर्शने सुरू झाली. युरोपियन युनियनने कठोर शब्दांत फाशीची निंदा केली. ऑस्ट्रेलियन परराष्ट्र व्यवहारमंत्री पेनी वोंग यांनीही फाशीची निंदनीय हत्या म्हणून निषेध केला.

Exit mobile version