लेबनॉनमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली असून या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये तब्बल २,८०० लोक जखमी झाले आहेत. माहितीनुसार, लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह च्या दहशतवाद्यांकडील हजारो पेजर्सचा एकाच वेळी स्फोट झाला. लेबनॉनच्या आरोग्यमंत्र्यांनी या घटनेतील जीवितहानीची माहित दिली आहे. या स्फोटांमागे इस्रायलचा हात असल्याचा आरोप हिजबुल्लाहने केला आहे. गेल्या वर्षभरापासून इस्रायल आणि लेबनॉनमध्ये संघर्ष सुरु आहे.
लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये मंगळवार, १७ सप्टेंबर रोजी झालेल्या बॉम्ब स्फोटांच्या मालिकेत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २,८०० लोक जखमी झाले आहेत. हिजबुल्लाह सदस्य आणि इतरांनी संवादासाठी वापरलेल्या पेजरमध्ये मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान स्फोट झाले. पेजरमधील मालिका बॉम्बस्फोटांच्या तपासासाठी हिजबुल्लाहने पथके तैनात केली आहेत. पेजर स्फोटाच्या घटनेनंतर जखमींच्या मदतीसाठी रुग्णालयात वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत.
दरम्यान, इराणच्या वृत्तसंस्थेने दावा केला आहे की, इराणचे लेबनॉनमधील राजदूत मोजतबा अमानी हे पेजरमध्ये झालेल्या मालिका स्फोटात जखमी झाले आहेत. तर, यात जखमी झालेल्यांमध्ये हिजबुल्लाहचे सैनिक आणि डॉक्टरांचाही समावेश आहे. गाझा आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धात हिजबुल्लाहकडून सतत इस्रायली संरक्षण दलांना लक्ष्य केले जात आहे. गेल्या काही दिवसांत हिजबुल्लाहकडून इस्रायलवर रॉकेट हल्लेही करण्यात आले होते. त्यामुळे या हल्ल्यामागे इस्रायल असल्याचे लेबनॉनचे म्हणणे आहे.
इस्रायलच्या मोसाद गुप्तहेर संस्थेने स्फोटाच्या पाच महिने आधी लेबनीज दहशतवादी गट हिजबुल्लाहने ऑर्डर केलेल्या ५ हजार तैवान-निर्मित पेजरमध्ये थोड्या प्रमाणात स्फोटके पेरली होती, असा दावा लेबनॉनकडून केला जात आहे. इस्रायली लोकेशन ट्रॅकिंग टाळण्याच्या प्रयत्नात हिजबुल्लाहचे दहशतवादी संवादाचे लो-टेक साधन म्हणून पेजर वापरत आहेत.
हे ही वाचा:
जम्मू- काश्मीर: १० वर्षांनी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात
सनातन धर्म…पुस्तकाची कहाणी पॉडकास्टच्या रूपात लवकरच येणार समोर, टीझर जारी
भारताने पाचव्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, चीनला केले पराभूत !
काँग्रेसची इकोसिस्टम खवळली, ‘सत्तेसाठी भुकेलेल्यांना गणेश पूजेची समस्या’
लेबनॉन आणि इस्रायलमध्ये तणाव वाढत असताना ही घटना घडली. इस्रायल आणि हमास यांच्यात गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ११ महिन्यांहून अधिक काळ लेबनीज दहशतवादी गट हिजबुल्लाह आणि इस्रायली सैन्यांमध्ये संघर्ष सुरु आहे. या युद्धात सीमेच्या दोन्ही बाजूंनी हजारो लोक बेघर झाले आहेत.